कात्रज घाटामध्ये एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 06:03 PM2022-11-04T18:03:28+5:302022-11-04T18:11:40+5:30
या अपघातामुळे कात्रज परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे...
पुणे : पुण्यातील कात्रज घाटामध्ये एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. घाटात झालेल्या अपघातात अमोल टकले ( वय 18 वर्ष रा. भवानी पेठ) याचा मृत्यू झाला असून पवन सुभाष जाधव हा या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी कात्रज घाट उतरत होती आणि बस वर जात होती त्यावेळी हा दोन्ही वाहनांचा अपघात समोरासमोर झाला. सदरील झालेल्या अपघातामुळे कात्रज चौकाकडून जुन्या बोगदाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सध्या पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
अपघातात मृत्यू झालेला युवक हा खेड शिवापुरकडून पुण्याच्या दिशेने येत होता तर एसटी महामंडळाची बस कोल्हापूरच्या दिशेने जात होती. या दोन्ही वाहनांचा अपघात भिलारवाडीजवळ कात्रज घाटात झाला. या अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू झाला असून जखमीला रुग्णालयात नेण्यात आले आहे.
अपघातानंतर घटनास्थळावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात, पोलीस कर्मचारी यांनी भेट दिली.