पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात; ४ जण जागीच ठार, १५ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 10:07 AM2023-02-01T10:07:58+5:302023-02-01T10:15:51+5:30
यवत जवळ भीषण अपघात बसची ट्रकला धडक
पुणे : सोलापूरहून पुण्याकडे येणार्या भरधाव टॅव्हल बसने थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात ४ जण जागीच ठार झाले असून १५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोलापूर -पुणे महामार्गावर यवत जवळील माणगाव सीएनजी पंपासमोर पहाटे सव्वा पाच वाजता घडला़. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. पोलीस कर्मचारी नितीन दिलीप शिंदे (वय ३६) अमर मानतेश कलशेट्टी (वय २०), गणपत मलप्पा पाटील (वय ५५), आरती बिराजदार (वय २५) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. अपघातात १५ जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबतची मिळालेली माहिती अशी, सोलापूरहून एक खासगी ट्रॅव्हल बस पुण्याकडे येत होती. सर्व प्रवासी झोपेत असताना पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास माणगावजवळील सीएनजी पंपाजवळ टायर फुटल्याने एक ट्रक रस्त्यात थांबलेला होता. बसचालकाला हा ट्रक उशीरा दिसला़ त्याला चुकवून पुढे जाताना चालकाचा अंदाज चुकला बसने ट्रकला मागून जोरात धडक दिली. त्यात बसची एक बाजू पूर्णपणे फाटली आहे. या अपघातात चालकही जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.