Accident: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 05:45 PM2023-03-12T17:45:01+5:302023-03-12T17:45:46+5:30
अपघात इतका भीषण होता कि पाचही तरुण हवेत उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले
भिगवण: पुणे सोलापूर महामार्गावर स्वामी चिंचवली (ता.दौंड ) गावच्या हद्दीत स्विफ्ट कारचा अपघात होवून २ तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ तरुण जखमी झाल्याची घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. सुसाट वेगामुळे गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडीने हवेत उडी मारीत १०० फुट पलट्या झाल्याने पाचही तरुण हवेत उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
वैभव विठ्ठल जांभळे (वय.२४ रा.तक्रारवाडी), प्रतिक पप्पू गवळी (वय २२ रा.मोशी ता.हवेली) अशी अपघातात जीव गमाविलेल्या तरुणांची नावे आहेत. तर सुरज राजू शेळके (वय २३) आशीफ बशीर खान (वय २२ दोघे रा. भिगवण) ऋषिकेश बाळासाहेब येळे (वय.२२ रा.इंदापूर) अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे तरुण आपसातील मित्र असून हे ५ जन सुरज शेळकेच्या स्विफ्टमधून पुणे येथे निघाले होते. मात्र भिगवणहून पुणे कडे जाताना गाडी सुसाट वेगाने जात असताना स्वामीचिंचोली गावच्या हद्दीत दुचाकी वाचविण्याच्या नादात गाडी वरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गाडीवरील ताबा सुटल्यामुळे तसेच महामार्गाला कोणताही संरक्षण कठडा नसल्यामुळे गाडी उडी घेत सर्विस रोडवर तर परत वरती जावून मुख्य मार्गाच्या चारीत पलटी झाली. गाडीचा वेग अगदीच सुसाट असल्यामुळे पाचही तरुण गाडीतून हवेत फेकले गेले. यातील वैभव आणि प्रतिक याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुरज,आशीफ आणि ऋषिकेश जखमी झाले.
यावेळी आसपास असणाऱ्या नागरिकांनी अपघातातील तरुणांना तातडीने भिगवण येथील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत केली. हे तरुण सुसाट वेगाचे बळी ठरले असले तरी याला महामार्गावर मुख्य मार्गाला संरक्षण कठडा असता तर जीव वाचू शकले असते अशी चर्चा अपघात स्थळी होताना दिसून आली. तर पुणे सोलापूर महामार्गावर सुसाट वेगामुळे जीव जात असताना हायवे प्रशासन अपघात प्रणव क्षेत्रावर कोणत्याही प्रकारच्या सुधारणा करत नसल्याचे दिसून येत आहे.
अपघातातील मृत तरुणांची भिगवण पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील तपासासाठी दौंड पोलीस ठाण्यात पाठविले जाणार असल्याची माहिती प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी दिली.