इंदापूरच्या तहसीलदारांच्या वाहनावर जीवघेणा हल्ला; घटनेचा निषेध, कामकाज बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 03:46 PM2024-05-24T15:46:38+5:302024-05-24T15:48:16+5:30
तहसीलदारांवर हल्ल्या झाल्याचे समजताच बारामतीत महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद केले
सांगवी : अज्ञातांकडून इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या वाहनावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्या प्रकरणी बारामती येथील प्रशासकीय भवनातील विविध कार्यालय बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहॆ. पुणे सोलापूर महामार्गालगत संविधान चौकाजवळ हल्लेखोरांनी तहसीलदारांचा चालक मल्हारी मखरे याच्या डोळ्यात तिखटाची पूड टाकली होती. स्कॉर्पिओ गाडीतून आलेले हल्लेखोर हल्ला करुन तात्काळ निघून गेले.
सुदैवाने तहसीलदार अथवा त्यांच्या चालकाला कसली ही दुखापत झाली नसल्याची माहिती पुढे आली आहॆ. तहसीलदारांवर हल्ल्या झाल्याचे समजताच बारामतीत महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद केले. महसूल अधिकाऱ्यांनी कामकाज बंद केल्यामुळे अनेक नागरिकांची कामे खोळंबली आहेत. झालेल्या हल्ल्यामुळे अचानक महसूल अधिकाऱ्यांनी हातातील सर्व कामे बाजूला सारून कामकाज बंद केल्यामुळे लांबच्या पल्ल्यावरुन प्रतिज्ञापत्रासह दाखल्यासाठी व विविध कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना मोकळ्या हाताने परतावे लागले. सततच्या सुट्ट्यांमुळे नागरिकांची कामे अडकली जात आहेत. त्यात अचानक बंद मुळे आज कामकाज बंद ठेवून शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस पुन्हा सुट्ट्यांमुळे नागरिक पुरते हैराण झालेले पाहायला मिळाले.