मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारचा भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 09:35 AM2023-03-17T09:35:59+5:302023-03-17T09:40:10+5:30
मालवाहू ट्रकला कारने मागून जोरात धडक दिली...
तळेगाव दाभाडे : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्या जवळील आढे गावच्या हद्दीत कंटेनर व कारचा भीषण अपघात झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. १७) सकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. या अपघातातील मृतात सासरे व जावई यांच्यासह चालकाचा समावेश आहे. राहूल बाळकृष्ण कुलकर्णी ( वय ४२ रा. गोंदवले, ता. माण,जि. सातारा, सध्या रा. ठाणे - मुंबई ), विजय विश्वनाथ खैर (वय ७१रा. रत्नशील अपार्टमेंट, कराड ) व हेमंत हरिश्चंद्र राऊत (वय ३९ रा. भाईंदर, ठाणे ) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
परंदवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी कार (क्र एम. एच. ०४ जे. एम. ५३४९) ही आढे गावच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक ८२ च्या जवळ आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. कारची पुढे जाणाऱ्या ट्रकला (क्र. आर. जे. ०९ जीबी - ३६३८) पाठीमागून जोरात धडक बसली. या धडकेत कारचा बराचसा भाग ट्रकखाली घुसला. त्यामुळे कारसह ट्रकखाली प्रवासी दबले गेले. अपघात स्थळी काचेचा खच आणि रक्ताचा सडा पडला होता.हे विदारक दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हेमंत राऊत कार चालवत होते.राहुल कुलकर्णी पुढील सीटवर बसले होते. तर विजय खैर पाठीमागे बसले होते. अपघातात मृत्युमुखी पडलेले विजय खैर व राहुल कुलकर्णी हे सासरे - जावई होते. राहुल कुलकर्णी गोंदवलेकर महाराजांच्या घराण्यातील सातवे वंशज होते. विजय खैर आपल्या मुलीला भेटण्यास मुंबईला गेले होते. राहुल कुलकर्णी व हेमंत राऊत हे अंधेरी येथील एका खाजगी कंपनीत कामाला होते. राहुल कुलकर्णी मुख्य व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. कंपनीच्या कामानिमित्त ते पुण्याला जात असताना हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच आईआरबी पेट्रोलिंग, वन्यजीव रक्षक मावळचे संस्थापक निलेश गराडे, अजय मुऱ्हे, स्थानिक ग्रामस्थ, देवदूत यंत्रणा आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार मधील मृतदेह बाहेर काढले. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उन्मेश गुट्टे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश कांबळे करत आहेत.