रेल्वे प्रवाशांचा जीवघेणा शॉर्टकट

By admin | Published: September 26, 2015 01:55 AM2015-09-26T01:55:56+5:302015-09-26T01:55:56+5:30

पश्चिम रेल्वेच्या पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या भागातील प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाची सुविधा केली आहे; तरीसुद्धा या ठिकाणी प्रवासी राजरोसपणे जीव धोक्यात घालून

Fatal shortcut of train passengers | रेल्वे प्रवाशांचा जीवघेणा शॉर्टकट

रेल्वे प्रवाशांचा जीवघेणा शॉर्टकट

Next

सचिन देव ,पिंपरी
पश्चिम रेल्वेच्या पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या भागातील प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाची सुविधा केली आहे; तरीसुद्धा या ठिकाणी प्रवासी राजरोसपणे जीव धोक्यात घालून, रेल्वे रूळ ओलांडत असल्याचे लोकमत प्रतिनिधींनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. रेल्वे रूळ ओलांडण्याचा त्यांचा हा शॉर्टकट मार्ग जीवघेणा ठरू शकतो.
पिंपरी-चिंचवड शहरातील पश्चिम रेल्वे मार्गावरील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी ही महत्त्वाची स्टेशन असून, या स्थानकांवरून सतत दहा ते पंधरा मिनिटांना मालगाड्या, लोकल, एक्सप्रेस धावत असतात. विविध खासगी-सरकारी उद्योगांची महत्त्वाची कार्यालये, शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा यांसह मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेले आहे. त्यामुळे रोज हजारो प्रवाशांची रेल्वे स्थानकावर गर्दी असते.
रेल्वेस्थानकावर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांसाठी पादचारी पूल उभारण्यात आला आहे. परंतु त्या ठिकाणी पोलिसांची आवश्यक सुरक्षा यंत्रणा नाही. त्यामुळे प्रवाशी बिनधास्त व राजरोसपणे जीव धोक्यात घालून रूळ ओलांडताना दिसतात. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या तिन्ही स्टेशनच्या ठिकाणी हीच परिस्थिती दिसून आली. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचाच सहभाग आहे. विशेष:त महिलावर्ग धोकादायकरित्या रूळ ओलांडताना दिसल्या. यापूर्वी स्टेशनवर अनेकदा रूळ ओलांडताना अपघात झालेले आहेत. त्यानंतरही रेल्वे प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय.
सकाळी ११.१५ : पिंपरी रेल्वेस्थानक
४पिंपरी स्थानकावर सकाळी ११.१५ वाजता पिंपरी मंडईकडून खरेदी करून काही महिला रेल्वे रूळ ओलांडून भारतनगरकडे येत होत्या, तर शालेय विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध नागरिक रूळ ओलांडून मंडईकडे जात होत्या. या वेळी शिवाजीनगर-लोणावळा लोकल येत असल्याचे ध्वनिक्षेपकावरून सूचनाही करण्यात होती. मात्र, तरीही विद्यार्थी रूळ ओलांडून मंडईकडे जात होते. दरम्यान, मंडईकडून भारतनगरकडे येण्यासाठी-जाण्यासाठी रेल्वेतर्फे पादचारी पूल असून, या भागातील नागरिक या पुलाचा वापर न करता, जीव धोक्यात घालून सर्रासपणे रूळ ओलांडत होते. अर्ध्या तासाच्या पाहणीत तब्बल १०० ते १५० जणांनी रेल्वे रूळ ओलांडला. तसेच परिसरात राहणारी काही मुलेही रेल्वे रुळाजवळच गप्पा मारताना दिसून आले, तर दोन व्यक्ती रुळाच्या मधोमध चालून प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिक बाटल्या उचलताना दिसून आली. दरम्यान, बऱ्याच वेळा या ठिकाणी रूळ ओलांडताना अपघात झाल्याच्याही घटना घडूनही, लहानापासून ते वृद्धापर्यंत सर्वच शॉर्टकट म्हणून वेळ वाचविण्यासाठी बिनधास्तपणे रूळ ओलांडत आहे.
दुपारी १२.५० : आकुर्डी रेल्वे स्थानक
४दुपारी १२.५० मिनिटांनी स्थानकावर पुण्याहून लोणावळ्याकडे जाणारी लोकल आल्यावर, उतरलेल्या प्रवाशांपैकी काही प्रवाशी लोकल गेल्यावर रूळ ओलांडून प्राधिकरणाकडे गेले. यामध्ये विद्यार्थी व काही महिलांचा समावेश होता, तर काही प्रवासी पादचारी पुलावरून न जाता, प्लॅटफार्मखाली उडी मारून गुरुद्वारकडे गेले. एका व्यक्तीला रेल्वे रूळ ओलांडण्याबद्दल विचारल्यावर, त्याने पादचारी पुलावरून जाण्यापेक्षा हा मार्ग शॉर्टकट असल्याचे सांगितले. तर, एका विद्यार्थाने वेळ वाचतो. पुलावरून जाण्याचा त्रास कोण घेणार? घराकडे जाण्यासाठी हा मार्ग सोपा असल्याचे त्याने उत्तर दिले. लोकल गेल्यानंतर एक महिला आपल्या बालिकेसह व एक वृद्ध व्यक्तीही पादचारी पुलावरून न जाता, रेल्वे रूळ ओलांडत होते. एकंदरीत पाहता सर्वच स्थानकांवर पादचारी पुलाची व्यवस्था करण्यात आली असूनही, बहुतांश प्रवासी रूळ ओलांडून ये-जा करीत असल्यामुळे पादचारी पूल फक्त नावालाच बनविले आहे.
रेल्वे पोलिसांचा पत्ता नाही
४प्रवाशांच्या व स्थानकाच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी एकही पोलीस आढळून आला नाही. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या तिन्ही स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होती.
४या ठिकाणी लोकल आल्यावर काही प्रवासी पादचारी पुलावरून, तर काही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करत होते. रूळ ओलांडणे कायदेशीर गुन्हा असून, दंडाची तरतूद आहे. मात्र, या ठिकाणी रेल्वे पोलीस उपस्थित नसल्यामुळे रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी जर कडक कारवाई केली, तरच नागरिक पादचारी पुलाचा वापर करतील.

Web Title: Fatal shortcut of train passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.