Pune Accident: पुण्यातील यवतजवळ एसटीचा भीषण अपघात; बसचा चेंदामेंदा, ३० जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 03:08 PM2024-06-23T15:08:15+5:302024-06-23T15:09:11+5:30
पुणे सोलापूर मार्गावरून जात असताना एसटी झाडावर आदळून घडला अपघात, ३० प्रवासी जखमी
पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात यवतजवळ असलेल्या सहजपुर गावाच्या हद्दीत एसटी बसचा अपघात झालाय. भरधाव वेगात असणारी एसटी झाडावर आदळून हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत बसमधील ३० जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळपासच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार एसटी बस पंढरपूर वरून मुंबईकडे चालली होती. पुणे सोलापूर रस्त्यावरून बस वेगाने जात असताना झाडावर आदळली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहीजण गंभीर असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.
अपघात इतका भीषण होता कि, अक्षरशः बसचा चेंदामेंदा झाल्याचे दिसून येत आहे. अपघातानंतर स्थानिक रहिवासी, समाजसेवक, पोलीस यांनी घातास्थळी धाव घेतली आहे. तसेच मदतकार्य सुरु झाले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. रस्त्यावरीलही वाहतूक कोंडीचे नियोजन पोलिसांकडून सुरु आहे. पुण्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. वारंवार होणाऱ्या जीवघेण्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता बसचालक, एसटी चालक यांच्यावरही विश्वास ठेवायचा का नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागलाय.