विद्यार्थ्यांचे भवितव्य लागले टांगणीला
By Admin | Published: December 24, 2016 12:15 AM2016-12-24T00:15:06+5:302016-12-24T00:15:06+5:30
मुळशी तालुक्यातील नोंदणीकृत शाळांत ४० हजार विद्यार्थी शिकत असून त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी मात्र तब्बल ७० शिक्षकांची
पौड : मुळशी तालुक्यातील नोंदणीकृत शाळांत ४० हजार विद्यार्थी शिकत असून त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी मात्र तब्बल ७० शिक्षकांची कमतरता आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २२३, खासगी संस्थांच्या ३४ माध्यमिक शाळा व इंग्रजी माध्यमाच्या ४३ अशा एकूण ३०० नोंदणीकृत शाळा आहेत. शिक्षक कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून, त्यासंदर्भात काही निवडक शाळा वगळता व्यवस्थापन संस्था व शासनाचा शिक्षण विभाग यांना त्याचे कोणतेच सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे.
खासगी संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्येही त्याच प्रमाणात शिक्षक कमी असल्याचे वास्तव आहे. या ३०० शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक ३० विद्यार्थ्यांच्या मागे १ शिक्षक, असे प्रमाण गृहीत धरले, तर तालुक्याची एकूण शिक्षकांची गरज १, ३३४ एवढी आहे. यातील जि. प.च्या प्राथमिक शाळांना आजही ७० शिक्षकांची कमतरता आहे. हा आकडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे उपलब्ध आहे. खासगी संस्थांच्या माध्यमिक शाळांचा विषय जि. प.च्या माध्यमिक विभागाच्या अखत्यारित असल्याने त्याची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे नसल्याचे या विभागाने कळविले आहे. जि. प. शाळांच्या तुलनेतच माध्यमिक शाळांमध्येही पात्र शिक्षकांची मोठी कमतरता आहे.
याबाबतीत काही जागरूक पालकांनी शाळांमध्ये चौकशी केली असता, शिक्षकभरती हा शासनाचा विषय असल्याने आम्ही काहीच करू शकत नसल्याचे सांगितले जाते. शासनाने काही वर्षांपासून नव्याने शिक्षकभरती थांबवून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन हा नियम लागू केला असल्याने संस्थाचालक आपल्या संस्थांच्या शाळांमध्ये कमतरता असूनही विद्यार्थिसंख्येच्या प्रमाणात शिक्षकांची आवश्यकता असूनही नियुक्ती करू शकत नाहीत. उपलब्ध असलेले अनेक शिक्षकही या ना त्या कारणाने बऱ्याचदा आपल्या व्यक्तिगत अडचणीमुळे बऱ्याचदा दीर्घ रजेवर असतात.