थेट सरपंच निवडीसाठी उत्साहात मतदान, गावकारभाºयांचे भवितव्य मतपेटीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:43 AM2017-10-17T02:43:34+5:302017-10-17T02:43:44+5:30
पुणे जिल्ह्यातील बारा तालुक्यांतील निवडणूक लागलेल्या २२२ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित १७३ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रकिया शांततेत पार पडली.
पुणे : जिल्ह्यातील बारा तालुक्यांतील निवडणूक लागलेल्या २२२ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित १७३ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रकिया शांततेत पार पडली. सोमेश्वरनगर येथे सोरटेवाडी केंद्रावर दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. पाटस येथेही दोन गटांत हाणामारी झाली. हे दोन प्रकार वगळता संपूर्ण जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले. आपल्या गावाचा कारभारी थेट निवडण्यासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. सकाळपासूनच मतदानासाठी ग्रामस्थांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणत मतदान झाले. दुपारी मतदानाचा वेग काहीसा मंदावला, मांत्र सायंकाळनंतर पुन्हा मतदानाचा टक्का वाढला. मतदानासाठी महिलांची संख्या लक्षणीय होती. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उद्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी सुरू होणार असून आज दुपारपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दौंड : तालुक्यात आठ ग्रामपंचायतींसाठी ८७.५५ टक्के मतदानांची नोंद झाली. दिवसभर मतदान शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार राजकुमार वाघमारे यांनी दिली. दौंड येथील प्रशासकीय इमारतीत उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. बोरीभडक, नांदूर, डाळींब, लोणारवाडी, पाटेठाण, देवकरवाडी, दहिटणे, दापोडी या ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. तर कुठलेही मतदान यंत्र बंद पडले नाही. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. सकाळी सुरू झालेल्या मतदानाचा ओघ दुपारी १२ पर्यंत चांगला होता. त्यामुळे मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. दुपारी बारानंतर मतदान थंडावल्याने मतदान केंद्र मतदारांअभावी ओस पडले होते. तर साधारणता चार वाजल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती
इंदापूर : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या सरासरी ८१ टक्के मतदान झाले. शांतता व सुव्यवस्थेत मतदान प्रक्रिया पार पडली. २५ हजार ६९७ पुरुष २२हजार ८९९ महिला अशा ४८हजार ५९६ पैकी मतदारांपैकी ३९ हजार ३४७ मतदारांनी मतदान केले. २१ हजार ६३ पुरुष व १८ हजार २८४ महिला अशी मतदारांची वर्गवारी होती, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील यांनी दिली. डाळज नं. २ ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक (९५ टक्के) मतदान झाले. बोरी ग्रामपंचायतीसाठी सर्वात कमी (३७ टक्के) मतदान झाले. उद्या सकाळी दहा वाजता येथील शासकीय गोदामात मतमोजणी सुरू होणार आहे, असे त्यांनी सांगितले. साडेसात ते साडेनऊ या पहिल्या दोन तासात मतदानाचा वेग कमी होता. ४ हजार ९७९ पुरुष व ३ हजार २५९ महिला अश्या ८ हजार २३८ मतदारांनी मतदान केले होते. मतदानाची टक्केवारी १७ होती. दुपारी दीड वाजेपर्यंत ती ५४ टक्यांपर्यंत पोहोचली. त्या वेळी १३ हजार ६६६ पुरुष व १२ हजार ७५१ महिला मतदार अशा २६ हजार ४१७ मतदारांनी मतदान केले होते. सायंकाळी साडेपाचपर्यंत २१ हजार ०६३ पुरुष व १८ हजार २८४ महिला असे ३९, ३४७ मतदारांनी मतदान केले.
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील एकूण नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली. तालुक्यात एकुण ९ ग्रामपंचायतीसाठी ८४ टक्के मतदान झाले. सावरगाव, आणे, साकुरी या मोठ्या गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांचा मोठा उत्साह होता, तर प्रामुख्याने आदिवासी भागातील छोट्या ग्रामपंचायतींच्या मतदानासाठीदेखील चुरस दिसून आली. आदिवासी भागात मतदान शांततेत पार पडल्याची माहिती जुन्नरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी सांगितले. तालुक्यात एकूण ३३ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सर्वात मोठ्या आणे ग्रामपंचायतीत चुरशीने झालेल्या मतदानात ३१६७ मतदारांपैकी २५०० मतदारांनी मतदान केले. येथे सरासरी ८२ टक्के मतदान झाले. सावरगाव ग्रामपंचायतीसाठी ८ जागांसाठी ७६.५६ टक्के मतदान झाले. आदिवासी भागातील हिवरे तर्फे मिन्हेर येथे ७८.२५ टक्के मतदान झाले.
मुळशी : तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीसाठी ७४ टक्के मतदानाची नोंद झाली. माळेगावला सर्वाधिक ८८ टक्के तर आडमाळ सर्वात कमी ४२ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांचे मतदानाचे प्रमाण जास्त दिसून आले. तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. माळेगावला सरपंच आणि प्रभाग एकमध्ये दोन जागांसाठी मतदान झाले.
गावात ६१६ पैकी ५४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यातही २८३ पैकी २५३ महिलांनी मतदान केले. असदे ग्रामपंचायतीत ८४ टक्के मतदान झाले. येथे सरपंच आणि प्रभाग तीनमधील एका जागेसाठी मतदान झाले. त्यात ४०७ पैकी ३४१ जणांनी मतदान केले. भोडे-वेडे ग्रामपंचायतीत ८१ टक्के मतदान झाले. येथेही सरपंच आणि प्रभाग क्रमांक एक आणि तीनमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक झाली. येथे एकूण ५७९ पैकी ४६८ जणांनी मतदान केले. आडमाळला सरपंच आणि प्रभाग क्रमांक एकमध्ये एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत १६५ पैकी ६९ जणांनी मतदान केले. मतमोजणी मंगळवारी पौडला पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे.
आंबेगाव : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीसाठी आज शांततेत मतदान पार पडले. सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी ६४ टक्के मतदान झाले होत. आंबेगाव तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीसाठी सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. आहुपे व नारोडी येथील सरपंचपदासाठी निवडणूक बिनविरोध झाली आहे. उर्वरित १९ गावांत सरपंचपदासाठी मतदान पार पडले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या लांडेवाडी गावातील प्राथमिक शाळेत सकाळी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या पत्नी कल्पनाताई आढळराव पाटील यांनीही या वेळी मतदान केले.
दरम्यान, घोडेगाव, लांडेवाडी, धामणी, चांडोली, कळंब, मेंगडेवाडी या गावात चुरशीने लढत झाली. बहुतेक गावांमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत प^नल व शिवसेना पुरस्कृत प^नलमध्ये थेट लढत झाली. मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती.
एकाच मतदान यंत्रावर चार मते द्यावी लागत असल्याने मतदारांचा गोंधळ उडत होता. अशा वेळी मतदान कर्मचाºयांना समजावून सांगावे लागत होते. सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जास्तीत जास्त मतदान करून घेण्याकडे उमेदवारांचा कल होता. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी ६४ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली. उद्या मतमोजणी घोडेगाव येथे होणार आहे.
बारामतीत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
बारामती : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८४.७७ टक्के मतदान झाले. यामध्ये १५ हजार ९४२ पुरुष मतदार, १४ हजार १०३ स्त्री मतदारांनी मतदान केले. सरपंच पदासाठी ३८, तर सदस्यपदासाठी २६३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रामध्ये आज बंद झाले. सोरटेवाडी ग्रामपंचायत अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी ३५ हजार ३८५ मतदारांपैकी ३० हजार ४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ५१ मतदान कें द्रांवर हे मतदान पार पडले. यंदा प्रथमच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आॅनलाइन पार पडली. ऐन दिवाळीत विजयी उमेदवारांचे मतदान निकालाचे फटाके फु टणार आहेत. बारामती एमआयडीसीतील रिक्रिएशन हॉलमध्ये मंगळवारी मतमोजणी होणार आहे. यंदा थेट जनतेमधून सरपंच निवड होणार आहे. त्यामुळे विजयी सरपंच आणि विजयी ग्रामपंचायत सदस्याचा असे दोन निकाल जाहीर होणार आहे. १२ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.