७ महिन्यांच्या बाळाचा खून केल्याच्या आरोपातून पित्याची पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 02:25 PM2021-04-12T14:25:09+5:302021-04-12T14:25:18+5:30
या खटल्यातील आरोपी सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला त्रास देत हे बाळ माझे नाही असे म्हणायचा...
बारामती : ७ महिन्याच्या बाळाचा खून केल्याच्या आरोपातून पित्याची बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, आर. आर. राठी यांनी पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता केली आहे.
जबेर करीम नालबंद (वय वर्षे ३० ) असे सात महिन्यांच्या बाळाच्या खूनप्रकरणी निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, आरोपी नालबंद हा त्याची पत्नी हसीना व ७ महिन्यांचा मुलगा शाहबाद, सासू रहीमत शेख यांचे सोबत सासरवाडी खडकआळी,पणदरे (ता.बारामती )येथे राहत होता. आरोपी त्याची पत्नी हसीनाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शाहबाद हा मुलगा माझा नसल्याचे तो म्हणायचा. या याच कारणावरून तो दारू पिऊन पत्नीला नेहमी त्रास देत होता.
२१ जुलै २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या आसपास आरोपी व शाहबाद दोघे घरीच होते. पत्नी हसीना व सासू रहीमत कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने मनात राग धरून मुलगा शाहबाद याचा टॉवेलने गळा दाबून खुन केला ,त्यानंतर तेथून निघन गेला. हसीना व तिची आई रहिमत घरी आल्यानंतर त्यांना मुलगा शाहबादची हालचाल होत नाही हे लक्षात आले. त्यास डॉ. निलेश शहा यांचे दवाखान्यात घेवून गेले.यावेळी डॉक्टरांनी शहाबाद ला मृत घोषित केल्याचा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला होता. वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. दोषारोपपत्र कोर्टात दाखल होवून सरकार पक्षाचे वतीने एकूण सहा (६) साक्षीदार तपासण्यात आले.
आरोपीच्या वतीने आगीचे वतीने अॅड. विनोद जावळे यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात प्रत्यक्ष दर्शनी साक्षीदार नाही. संपूर्ण केस परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून आहे. साक्षीदारांच्या जबाबामध्ये तफावत निर्माण होते. साक्षीदार पत्नी हसीना व साक्षीदार सासु रहीमत सरकार पक्षास सहकार्य करत नाहीत. वैद्यकीय पुरावा निष्पन्न होत नाही. पोलिसांच्या तपासावर संशय निर्माण होतो, असे विविध मुद्दयांवर अॅड. जावळे यांनी युक्तीवाद केला. हा युक्तीवाद ग्राहय धरत आरोपीची प्रस्तुत केसमधून पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने अॅड. जावळे यांच्यासह अॅड. गणेश धेंडे, अॅड. जीवन पवार, अॅड. प्रणिता जावळे, अॅड. मोनिका निकाळजे, अॅड. बीमा पवार व अॅड मानसी संजय गायकवाड यांनी कामकाज पाहिले.
————————————————