वडिलांचे बाहेरील महिलेशी प्रेमसंबंध; मुलांनीच काढला काटा, वडिलांचा मृतदेह जाळला भट्टीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 04:02 PM2022-12-25T16:02:08+5:302022-12-25T16:02:16+5:30
वडिलांचे नागपूर येथील एक महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यांची तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती
चाकण : वडिलांचे बाहेरील महिलेशी प्रेमसंबंध असल्याने मुलांनी आपल्या वडिलांचा काटा काढून ‘दृश्यम’ चित्रपटातील दृश्याप्रमाणे त्यांचा मृतदेह कंपनीच्या भट्टीत टाकला व तो पूर्णपणे जाळला. मात्र, पोलिसांच्या कल्पक तपासाने दोन सख्ख्या भावांना अवघ्या दोन तासांत गजाआड करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.धनंजय बनसोडे (वय ४५, रा. निघोजे, ता. खेड) असे खून करण्यात आलेल्या वडिलांचे नाव आहे.
सुजित धनंजय बनसोडे (वय २२, रा. निघोजे), अभिजीत धनंजय बनसोडे (वय १८, रा. निघोजे) अशी अटक करण्यात आलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय बनसोडे यांचा फरसाण बनविण्याचा व्यवसाय असून, त्यांची ‘ग्लोबल फूड्स’ नावाची कंपनी आहे. ते १५ डिसेंबर रोजी राहत्या घरातून कुठेतरी निघून गेल्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांचे नागपूर येथील एक महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यांची तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. याबाबतची माहिती समजल्यानंतर धनंजय यांचे घरात पत्नी व मुले सुजित, अभिजित यांच्याशी वारंवार वाद होत होते. त्यामुळे आपली मुले आपला घातपात करून जिवे ठार मारतील, अशी शंका त्यांना आली होती व ती त्यांनी नागपूर येथील प्रेयसीस बोलून दाखवली होती. दरम्यान, धनंजय हे बेपत्ता असल्याबाबत तपास करताना पोलिसांना त्यांच्या प्रेयसीबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला.
दरम्यान, महाळुंगे पोलिसांत धनंजय बनसोडे मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार तांत्रिक माहिती वापर करून तपास करत असताना पोलिसांनी मुले सुजित आणि अभिजीत यांकडे अधिक तपास केला असता वडिलांचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने त्याला जिवे ठार मारल्याचे कबूल केले. पुढील तपास म्हाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिस करत आहेत.
ग्लोबल फूड्स कंपनीचे मालक धनंजय बनसोडे यांच्या दोन मुलांनी (दि. १५ डिसेंबर) रात्री साडेबाराच्या दरम्यान त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून त्यांचा खून केला. त्यानंतर दृश्यम चित्रपटात असलेल्या कथानकाप्रमाणे त्यांचा मृतदेह कंपनीच्या भट्टीत टाकला व तो पूर्णपणे जाळला. त्यांची हाडे फक्त शिल्लक राहिली. त्यानंतर (दि. १९ डिसेंबर) रोजी दोन्ही मुलांनी पोलिसात वडील बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.