बहीण म्हणून सांगणाऱ्या महिलेसोबत वडीलांना मुलीनेच पकडले लॉजवर रंगेहाथ; पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 17:12 IST2022-12-31T17:07:12+5:302022-12-31T17:12:52+5:30
तरुणीचे वडील आणि एका महिलेवर गुन्हा दाखल...

बहीण म्हणून सांगणाऱ्या महिलेसोबत वडीलांना मुलीनेच पकडले लॉजवर रंगेहाथ; पुण्यातील घटना
पुणे : आपली बहीण असल्याची ओळख सांगता आणि तिच्याबरोबर लॉजवर काय करता, असा प्रश्न तरुणीने वडिलांना विचारत रंगेहाथ पकडले. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी आपल्याच मुलीला मारहाण करुन तिला लॉजच्या त्याच खोलीत कोंडून दोघे पसार झाले. ही घटना हवेली तालुक्यातील कुडजे येथील साहील लॉजवर २८ डिसेबर रोजी दुपारी साडेचार वाजता घडली. याबाबत एका २८ वर्षाच्या तरुणीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन किरकटवाडी येथे राहणार्या तरुणीचे वडील आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकटवाडी येथे राहणार्या फिर्यादी यांचे वडील कर्वेनगर येथे राहणार्या एका महिलेची आपली बहीण असल्याची ओळख सांगत तिच्याबरोबर संबंध ठेवून होते. फिर्यादी यांना त्यांच्या संबंधाविषयी संशय होता. त्यामुळे ती आपल्या वडिलांच्या पाळतीवर होती. २८ डिसेंबर रोजी ते दोघे साहिल लॉजवर गेले असताना फिर्यादीही तेथे गेल्या. तेथे एका रुममध्ये त्यांनी त्या दोघांना रंगेहाथ पकडले. ही तुमची बहीण आहे, असे आम्हाला सांगता मग तिला घेऊन येथे लॉजवर काय करताय, असे वडिलांना तिने विचारले. तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन रिलिंगवर आपटून फोडला. दोघांनी तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
हा प्रकार लॉजमधील कामगार पाहत होते. त्या दोघांनी फिर्यादी यांचा शर्ट फाडल्यामुळे कामगारासमोर हा प्रकार घडल्याने तिच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतर त्यांनी तिला रुममध्ये ठेवून बाहेरुन दरवाजा बंद करुन पळून गेले. उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.