SSC Result: बाप - लेकाने दिली साेबतच दहावीची परीक्षा; वडिल पास, लेक मात्र नापास...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 07:56 PM2022-06-17T19:56:54+5:302022-06-17T19:58:39+5:30
बापाने बाजी मारली ४६ टक्के मिळवून पासही झाला. पण, मुलगा मात्र दाेन विषयात नापास
पुणे : ‘त्या’ विदयार्थ्याचे शिक्षण जेमतेम सातवी झालेले. मध्ये ३० वर्षे खंड पडला. पण, शिक्षणाचे वय उलटले तरी त्याची शिक्षणाची उर्मी कायम हाेती. मग काय वयाच्या ४३ व्या वर्षी दहावीचा फाॅर्म भरला व अभ्यास सूरू केला. त्यांचा मुलगाही यंदा दहावीला हाेता. दाेघा बापलेकांनी परीक्षा दिली. त्यामध्ये बापाने बाजी मारली ४६ टक्के मिळवून पासही झाला. पण, मुलगा मात्र दाेन विषयात नापास झाला.
शिक्षणाला काही वय नसते असे गुलटेकडी परिसरात राहणारे अशाेक (नाव बदललेले) यांनी सिध्द करून दाखवले आहे. अशाेक हे टेम्पोचालक असून त्यांनी अशोका महाविद्यालय येथून दहावीची परीक्षा देऊन दहावी मध्ये तब्बल तीस वर्षांनंतर हे यश संपादन केले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
अशाेक यांनी १९९२ मध्ये सातवीतून शाळा साेडली. त्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शाळा साेडून कामाला लागले. मात्र, शिक्षण अपुरे राहिल्याची खंत काेठेतरी वाटत हाेती. त्यांनाही वाटले की चला आपण पुढील शिक्षण घेऊ शकतो. म्हणून टेम्पो चालवण्याचा व्यवसाय करीत बाहेरून अशोका विद्यालयातून दहावीचा परीक्षेचा १७ नंबरचा फाॅर्म भरला. त्यांनंतर पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले.
शिक्षण हे केव्हाही कधीही घेऊ शकतो ते आज मी वयाच्या ४३ वर्षी दहावीची परीक्षा देऊन पहिल्या प्रयत्नात यश संपादन केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खचून न जाता कठोर परिश्रम आणि जिद्द असेल तर यश नक्कीच मिळते, असा संदेश त्यांनी दिला आहे.