मुलाकडून वडिलांना मारहाण; दाखल खटल्यातून मुलाची तब्बल ९ वर्षांनी निर्दोष मुक्तता
By नम्रता फडणीस | Published: September 13, 2022 05:56 PM2022-09-13T17:56:40+5:302022-09-13T17:56:46+5:30
खटल्याच्या सुनावणी कामी वडील, डॉक्टर, व तपासी अंमलदार यांच्यासह इतर एक अशा चार साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली
पुणे : घरात रात्री मुलाने स्वयंपाक घरातील वाडग्याने मारल्याने डोक्यात दुखापत झाली आणि मुलाने शिवीगाळ केली अशी तक्रार वडिलांनी केल्याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मारहाणीच्या खटल्यातून तब्बल नऊ वर्षांनी मुलाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंधिकारी एस व्ही निमसे यांनी हा निकाल दिला. 2012 मध्ये ही घटना घडली होती.
आरोपी मुलाच्या वतीने अँड अमित राठी यांनी न्यायालयात बाजू मांडली. खटल्याच्या सुनावणी कामी वडील, डॉक्टर, व तपासी अंमलदार यांच्यासह इतर एक अशा चार साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली, परंतु वडिलांच्या आणि डॉक्टरांच्या उलट तपासणी मध्ये त्यांनी दिलेल्या जबाबात तफावत आल्याने तसेच कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने, तसेच दुखापती बाबतचा वैद्यकीय दाखला प्रस्तावित नियमावली नुसार दिलेला नसल्याने तसेच त्यावर एमएलसी क्रमांक नसल्याने तो पुरावा ग्राह्य धरता येणार नाही. तसेच वडिलांच्या उलटतपासणी मध्ये वडिलांनी मुलाचे आणि त्यांचे संबंध चांगले नसल्याची कबुली दिली. त्यावरून दिलेली तक्रार खोट्या स्वरूपाची असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. व पंचनामे कायद्याच्या चौकटीत न बसणारे असल्याने, तथाकथित तक्रार खोटी असल्याचा व पुराव्यावरून जर दोन संभाव्य मते समोर आली. तर आरोपीला अनुकूल असलेल्या मताला प्राधान्य देण्यात यावा असा युक्तिवाद अँड राठी यांनी केला. तो ग्राह्य धरीत आरोपीची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. याकामी आरोपी तर्फे अँड अमित राठी व अँड अविनाश पवार यांनी काम पाहिले.