व्हॉट्स ऍपवर मुलासोबतचं चॅटिंग पाहिलं; बापानं दोन मुलींच्या अंगावरून ट्रक चालवला, स्वत:लाही संपवलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:10 AM2021-04-19T04:10:55+5:302021-04-19T07:10:28+5:30
पिंपरी : कोणत्यातरी मुलासोबत व्हॉटसॲपवर चॅटिंग करून मुलगी चुकीचे वागली. त्यामुळे आम्ही आमचे जीवन संपवत आहोत. त्यासाठी कोणालाही दोषी ...
पिंपरी : कोणत्यातरी मुलासोबत व्हॉटसॲपवर चॅटिंग करून मुलगी चुकीचे वागली. त्यामुळे आम्ही आमचे जीवन संपवत आहोत. त्यासाठी कोणालाही दोषी न धरता आमचा अंत्यविधी एकत्रच करावा, अशी चिठ्ठी लिहून पित्याने पोटच्या दोन मुलींच्या अंगावरून ट्रक चालवून स्वत: ट्रकखाली आत्महत्या केली. मावळ तालुक्यातील इंदोरी गावात रविवारी (दि. १८) ही धक्कादायक घटना घडली.
नंदीनी भरत भराटे (वय १८), वैष्णवी भरत भराटे (वय १४), भरत ज्ञानदेव भराटे (वय ४०, सर्व रा. इंदोरी, ता. मावळ, मूळ रा. सावडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), अशी मयतांची नावे आहेत. मयत मुलींची आई सपना भरत भराटे (वय ३६) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयत भरत भराटे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत यांच्याकडे एक ट्रक होता. तसेच त्याची पत्नी सपना एका कंपनीत नोकरी करतात. मुलगी नंदिनी ही तिच्या मोबाईलच्या व्हाट्सॲपवर कोणत्यातरी मुलाला चॅटिंग करत होती. याचा राग अनावर झाल्याने भरतने नंदीनी व वैष्णवी या दोन्ही मुलींना शनिवारी दमदाटी केली. फिर्यादी कंपनीतून घरी आल्यानंतर मुलींनी घडलेला प्रकार सांगितला. भरतने एक चिठ्ठी लिहिली. चिठ्ठीत काय लिहिले आहे, याबाबत भरतने फिर्यादीला सांगितले नाही.
फिर्यादी सपना व त्यांच्या मुली शनिवारी रात्री जेवण करून झोपल्या. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास दोन्ही मुलींना दमदाटी करून भरत याने रस्त्यावर झोपवले व ट्रक सुरू केला. ट्रकच्या आवाजामुळे जाग आल्याने फिर्यादी घराबाहेर आल्या. त्यावेळी दोन्ही मुली घरासमोरील रस्त्यावर झोपल्या असल्याचे त्यांना दिसले. भरत याने मुलींच्या अंगावरून ट्रक चालवला. ट्रक चालू स्थितीत असताना ट्रकमधून उडी मारून स्वतः ट्रकच्या समोर झोपून भरत याने आत्महत्या केली.
कोणालाही दोषी धरू नये....
मयत भरत याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. मुलगी चुकीची वागते. त्यामुळे आम्ही आमचे जीवन संपवत आहोत. त्यासाठी कोणालाही दोषी धरण्यात येऊ नये. आमचा अंत्यविधी एकत्र करावा असे त्या चिठ्ठीत नमूद केले आहे.