बाप रे बाप, वाढला उन्हाचा ताप!
By admin | Published: April 21, 2015 03:02 AM2015-04-21T03:02:11+5:302015-04-21T03:02:11+5:30
उन्हाचा झळा वाढल्याने आज सोमवारी दुपारी घराबाहेर पाऊल ठेवणे अवघड झाले होते. असह्य चटक्याने नागरिक आणि
पिंपरी : उन्हाचा झळा वाढल्याने आज सोमवारी दुपारी घराबाहेर पाऊल ठेवणे अवघड झाले होते.
असह्य चटक्याने नागरिक आणि वाहनचालक पोळून निघाले. तळपत्या उन्हामुळे रहदारी तुरळक झाली होती, तर काही भागात रस्ते ओस पडले होते. थंड पेय, सरबत पिऊन शरीराची लाही लाही कमी करताना प्रयत्न काहींनी केला. मात्र, त्याचा फारसा फरक पडला नाही.
रविवारपासून उन्हाच्या झळा वाढल्या. सकाळपासून वातावरणात गरम वारे वाहत होते. दुपारी बारानंतर उन्हाचा तडाखा अधिक झाला. बाहेर ऊन अधिक दिसत नव्हते. काहीसे ढगाळ वातावरण होते. मात्र, उन्हाचा झळा असह्य होत्या. पादचारी आणि वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वार, रिक्षा व टेम्पोचालकांना त्याची तीव्रता जाणवली.
उन्हाच्या चटक्याने नागरिक अक्षरश: पोळून निघाले. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. घामाच्या धारा रुमालाने टिपल्या जात होत्या. घशाला कोरड पडत होती. रस्त्याकडेच्या टपरीवर लिंबाचा रस, लस्सी, उसाचा रस, नीरा, ताक, थंड पेय, नारळ पाणी पिण्यास पसंती
दिली जात होती. तसेच, आईस्क्रीम आणि कलिंगड खाल्ले जात होते. त्यामुळे थोडासा दिलासा मिळत होता. मात्र, प्रचंड उकाड्याने थोड्या वेळाने पुन्हा ‘जैसे थे’ स्थितीने नागरिक हैराण झाले होते.
उन्हाच्या झळ्यापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी दुपारी वाहने रस्त्यावर न काढता घरीच किंवा कार्यालयात थांबणे पसंत केले. यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या तुरळक होती. काही रस्ते तर ओस पडले होते. रस्त्याकडेच्या झाड्याच्या सावलीत दुचाकीस्वार थांबून विश्रांती घेत होते. हेल्मेट आणि टोपीतून घामाच्या धारा वाहत होत्या. (प्रतिनिधी)