संतापजनक! पोटच्या मुलीवर केला वारंवार बलात्कार; नराधम बापास मरेपर्यंत जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 08:49 PM2022-01-14T20:49:21+5:302022-01-14T20:49:34+5:30
पोटच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणा-या नराधम बापास न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि 50 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे
पुणे : पोटच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणा-या नराधम बापास न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि 50 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश (पॉक्सो) के.के जहागीरदार यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
43 वर्षे वयाचा आरोपी हा मूळचा चित्रकूट (उत्तरप्रदेश) येथील रहिवासी असून, तो पुण्यातील एका बांधकाम साईटवर सुपरवायझर म्हणून काम करीत होता. त्याची पत्नी मयत झाल्यावर आरोपी त्याच्या दोन्ही मुलांना घेऊन पुण्यात राहण्यासाठी आला होता. या बाबत गुन्हा दाखल होण्याच्या तीन वर्षे आधीपासून आरोपीने १३ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केला होता. बाप करीत असलेला प्रकार असह्य झाल्यावर मुलगी स्वत: पोलिस ठाण्यात गेली होती. त्यावेळी रडत असलेल्या मुलीला पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या महिलेला बोलावून धीर दिला व तिच्याकडून माहिती घेतली. वडील माझ्यावर वारंवार बलात्कार करीत असल्याचे आणि याबाबत कोणाला माहिती दिली तर भावाला मारून टाकीन, अशी धमकी देत असल्याचे तिने सांगितले. त्यांनी भावासमोर सुद्धा हे कृत्य केल्याचे मुलीने सांगितले. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या महिलेने दिलेल्या फियार्दीनुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्यात तपासले नऊ साक्षीदार
या खटल्यात विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी फिर्यादी, मुलगी, डॉक्टर आणि तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वाच्या ठरली. डॉक्टरांच्या साक्षीवरून मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले. ब्रह्मे यांनी आरोपीने स्वत:च्या मुलीवर वारंवार बलात्काराचे कृत्य केले असून, जर आरोपीला कमी शिक्षा दिली तर समाजात चुकीचा संदेश जाईल म्हणून त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद केला. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. मुलीस मनोधैर्य योजनेंतर्गत नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक अश्विनी पाटील यांनी केला. खटल्यात पोलिसनाईक विशाल मदने व पोलीस हवालदार सचिन शिंदे यांनी सरकार पक्षाला मदत केली.