Pune Crime: बापानेच केला सावत्र मुलाचा कोयत्याने वार करून खून; आरोपी ३ तासात जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 12:55 PM2021-10-24T12:55:15+5:302021-10-24T12:55:22+5:30
बारामती तालुक्यातील पारवडी येथे बापाने सावत्र मुलाचा कोयत्याने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे
बारामती : बारामती तालुक्यातील पारवडी येथे बापाने सावत्र मुलाचा कोयत्याने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाने वनविभागाच्या झाडीत लपलेल्या आरोपीला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी सावत्र मुलाचा खुन करुन पसार झालेला आरोपी ३ तासाच्या आत अटक करुन जेरबंद केले आहे.
पारवडी गावचे पोलीस पाटीलांनी पारवडी गावचे हददीत शिपकुले वस्ती येथे कातकरी समाजातील एकाने स्वतःच्या मुलाचा कोयत्याने डोक्यात वार करुन खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक ढवाण हे पोलीस स्टाफसह घटनास्थळी पोहचले. यावेळी आरोपी मारुती साधुराम जाधव हा मजुरी साठी पारवडी गावचे हददीत आला असून त्याने त्याचा सावत्र मुलगा गोपीनाथ मारुती जाधव याची घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. त्या रागात मारुती जाधव याने स्वतःच्या मुलाच्या डोक्यात लोखंडी धातुच्या कोयत्याने डोक्यात व मानेवर वार करत खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाला.
आरोपीस अवघ्या ३ तासात ताब्यात घेण्यात पोलिसांना यश
गुन्हेशोध पथकाने तत्काळ आरोपी अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. आरोपी मोबाईल वापर करीत नसल्याने त्याचा शोध घेणे कठीण होते. तसेच त्याचे कोणी नातेवाईक वगैरे नसल्याने आरोपीची कोणतीही ओळख फोटो उपलब्ध नव्हता. सदर आरोपी अटक करणे जिकीरीचे काम होते. गुन्हेशोध पथकाने पोलीस निरीक्षक ढवाण यांच्या सूचने प्रमाणे घटना स्थळापासूनचा वनविभागाचा १० ते १५ कि मी चा टप्पा पायी चालत शोधमोहीम राबवली. त्यानंतर वनविभागातील झाडीत लपलेला आरोपीस अवघ्या ३ तासात ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.