१० वर्षांच्या संसारानंतरही सासरी छळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:06+5:302021-06-11T04:08:06+5:30

पुणे : कोणतेही संकट आले की त्याचा पहिला फटका बसतो तो समाजातील सर्वांत खालच्या वर्गाला आणि महिलांना. कोरोना संसर्गाच्या ...

Father-in-law persecution continues even after 10 years of marriage | १० वर्षांच्या संसारानंतरही सासरी छळ सुरूच

१० वर्षांच्या संसारानंतरही सासरी छळ सुरूच

Next

पुणे : कोणतेही संकट आले की त्याचा पहिला फटका बसतो तो समाजातील सर्वांत खालच्या वर्गाला आणि महिलांना. कोरोना संसर्गाच्या या जागतिक महामारीत हेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दुसऱ्या लॉकडाऊनमध्येही कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्याचे दिसून आले आहे.

विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक देऊन तिचा छळ करण्याच्या यंदा आत्तापर्यंत १३१ घटना घडल्या. त्या तुलनेत गेल्या वर्षी जूनअखेर ११५ घटना घडल्या होत्या. राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार विवाहानंतर महिलांवर हिंसाचार केल्याच्या तक्रारीचे राष्ट्रीय प्रमाण २८.९ टक्के आहे. महाराष्ट्रातही हे प्रमाण २१.४ टक्के इतके आहे. पुण्यात हे प्रमाण २७ टक्के इतके आहे. विशेषत: आयटी क्षेत्रात घरगुती हिंसाचार वेगाने वाढतो आहे.

महिलांच्या हिंसाचारामध्ये प्रामुख्याने विवाहानंतर वर्षभरापासून ते वयाच्या ३५ वर्षांपर्यत महिलांचा छळ होण्याच्या तक्रारी दाखल होताना दिसतात.

चौकट

‘सोशल मीडिया’मुळे वाढली भांडणे

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुण विवाहितांमध्ये परस्परांबद्दलचा संशय वाढू लागला आहे. एकमेकांशेजारी बसले असतानाही एकमेकांशी संवाद न करता मोबाईलमध्ये चॅटिंग करतानाचे दृश्य घराघरात दिसू लागले आहे. पुढचे मागचे काही माहिती नसताना एखादा दुसरा मेसेज, एखाद्या समारंभातील फोटोवरून एकमेकांविषयी संशयाची सुई डोक्यात वळवळू लागते. त्यातून आपसातील संबंध बिघडू लागतात.

चौकट

वंशाला वारसा हवा

अनेकदा मुली झाल्यानंतर ‘वंशाला वारस हवा’ या संकल्पनेतून अजूनही विवाहित स्त्रियांचा छळ होताना दिसतो. त्यासाठी बेकायदेशीरपणे लिंगभेद चाचणी करून मुलगी असेल तर जबरदस्तीने गर्भपात करण्याच्या घटना घडत आहेत. अनेक घटनांमध्ये महिलांना माहेरचा आधार नसतो. त्यामुळे सासरी छळ होत असला तरी त्या तो सहन करीत संसाराचा गाडा हाकत असतात. अगदी लग्नाला २०-२० वर्षे झाल्यानंतरही सासरच्या लोकांकडून सातत्याने टोमणे ऐकून घ्यावे लागतात.

चौकट

पुरुषांची मानसिकता कधी बदलणार?

महिलांचा छळाचे प्रकार कमी होण्यासाठी घरातूनच संस्कार व्हायला हवेत; परंतु अजूनही तसे होताना दिसत नाही. त्यासाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदल होण्याची आवश्यकता आहे. महिलांसाठी अनेक कायदे केले असले तरी पोलिसांचा धाक राहिलेला नाही. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अजूनही महिलांना चकरा माराव्या लागतात. यासाठी समुपदेशनाबरोबरच समाज प्रबोधनाची चळवळ उभारण्याची आवश्यकता आहे. स्वयंसेवी संघटनांची मदत घेऊन समुपदेशन करण्याची गरज आहे.

-अ‍ॅड. वैशाली चांदणे, अध्यक्ष, दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन

चौकट

केवळ कायद्याचा धाक कामाचा नाही

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना अजूनही मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. या पीडित महिलांच्या समुपदेशनासाठी ऑनलाइन हेल्पलाइनची आवश्यकता आहे. महिलांनीही छळ सहन न करता जवळच्या महिला संघटना, पोलीस यांच्याशी संपर्क साधावा. महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार कमी व्हावा, यासाठी समाजानेही आपला वाटा उचलण्याची गरज आहे. केवळ कायदे करून व त्याचा धाक दाखवून हा प्रश्न सुटण्यासारखा नाही. त्याचबरोबर एकमेकांशी साथीने संसार होत असतो, ही भावना पुरुषांमध्ये वाढीस लावण्याची आवश्यकता आहे.

-किरण मोघे, सामाजिक कार्यकर्त्या

Web Title: Father-in-law persecution continues even after 10 years of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.