पित्याने मूत्रपिंड देऊन वाचविले मुलाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 03:48 AM2018-04-05T03:48:06+5:302018-04-05T03:48:06+5:30
मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त झालेल्या मुलाला त्याच्या वडिलांनीच स्वत:चे मूत्रपिंड देऊन जीवनदान दिले आहे. ससून रुग्णालयात बुधवारी ही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. जिवंत दात्याकडून दान केलेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाची राज्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयांमधील ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे.
पुणे - मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त झालेल्या मुलाला त्याच्या वडिलांनीच स्वत:चे मूत्रपिंड देऊन जीवनदान दिले आहे. ससून रुग्णालयात बुधवारी ही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. जिवंत दात्याकडून दान केलेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाची राज्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयांमधील ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गौंड गावचे रहिवासी असलेले ६३ वर्षीय देविदास गंडुले असे या दात्याचे नाव आहे. पत्नी, तीन मुले, एक सून आणि दोन नातवंडे असा शेतकरी असलेल्या गंडुले यांचा परिवार आहे. त्यांचा रामेश्वर हा ३५ वर्षीय मोठा मुलगा मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होता. हा विकार इतक्या वेगाने बळावला, की काही महिन्यांमध्येच त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली. मूत्रपिंड प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. त्यासाठी मूत्रपिंड दात्याचा शोध सुरू झाला. मग, आपल्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी देविदास गंडुले धावून आले.
मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पुण्यातील ससून रुग्णालयात होऊ शकते, अशी माहिती त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयातून मिळाली. त्यानुसार ते ससूनमध्ये दाखल झाले. वडीलच मूत्रपिंड दान करणार असल्याने तातडीने प्रत्यारोपण करण्याच्या निर्णय घेण्यात आला. बुधवारी देविदास गंडुले यांचे एक मूत्रपिंड प्रत्यारोपित करण्यात आले. त्यामुळे रामेश्वर यांना जीवनदान मिळाले आहे. खासगी रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी किमान पंधरा लाख रुपये खर्च येतो. हा खर्च गंडुले कुटुंबाला परवडण्याच्या पलीकडे होता. यासाठी मूत्रपिंड दान करणारे आणि प्रत्यारोपण अशा दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतात. मात्र, ससून रुग्णालयात महात्मा फुले जीवनदायी योजनेतून ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या प्रोत्साहनाने डॉ. अभय सदरे, डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. भालचंद्र कश्यपी, डॉ. धनेश कामेरकर, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. संयोगिता नाईक, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. अमित भांगले, डॉ. योगेश गवळी, डॉ. हरीश टाटिया, डॉ. भारती दासवाणी या डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. या पथकाला अर्जुन राठोड व सय्यद सिस्टर यांचे सहकार्य लाभले.
ब्रेनडेड दात्यांच्या मरणोत्तर दान केलेले मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याच्या तीन शस्त्रक्रिया ससून सर्वोपचार रुग्णालयात यशस्वी झाल्या आहेत. मात्र, जिवंतपणी मूत्रपिंड दान करून रक्ताचे नाते असलेल्या रुग्णावर ते प्रत्यारोपित करण्याची राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील पहिली शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात झाली. तज्ज्ञ, कुशल वैद्यकीय तज्ज्ञ आणि अद्ययावत वैद्यकीय उपकरणांनी रुग्णालय सुसज्ज होत असल्याने या शस्त्रक्रिया करणे शक्य होत आहेत.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता ससून रुग्णालय