पोटच्या मुलींसमोर नग्न होऊन नृत्य; नराधम पित्याला नऊ महिने सक्तमजुरीची शिक्षा
By नम्रता फडणीस | Updated: March 28, 2025 20:41 IST2025-03-28T20:41:00+5:302025-03-28T20:41:32+5:30
दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार

पोटच्या मुलींसमोर नग्न होऊन नृत्य; नराधम पित्याला नऊ महिने सक्तमजुरीची शिक्षा
पुणे: एका खाजगी कंपनीत कामगार असलेल्या पित्याने पोटच्या अल्पवयीन मुलींसमोर नग्न होऊन नृत्य तसेच अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला नऊ महिने सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पॉक्सोच्या विशेष न्यायाधीश सोनाली राठोड यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही त्यांनी निकालात नमूद केले.
ही घटना 23 जानेवारी 2019 रोजी घडली. सहा महिने व नऊ वर्षीय मुलींबाबत घडलेल्या घटनेप्रकरणी 26 वर्षीय महिलेने रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी हा येथील एका खाजगी कंपनी कामगार आहे. तर, फिर्यादी या गृहिणी आहेत. घटनेच्या दिवशी फिर्यादी या स्वयंपाकगृहात काम करत होत्या. लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी खोलीकडे धाव घेतली. यावेळी, आरोपी चिमुकलीसमोर नग्न होऊन नृत्य करीत होता. यादरम्यान, नऊ वर्षीय मुलगी शिकवणीवरून घरी आली. त्यावेळीही आरोपीने तिच्यासमोर नग्न जात मुलीला स्वत:जवळ ओढून अश्लिल वर्तन करत विनयभंग केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले.
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक करत गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणात, सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये, पीडिता, फिर्यादी, पंच व तपासी अधिकार्यांची साक्ष महत्त्वाची धरली. यावेळी, अॅड. ब्रम्हे यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने नऊ महिने सक्तमजुरीसह वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.