लेकीची वाट पाहत वडील थांबले गाडीजवळ! शरद पवार-सुप्रिया सुळे कार्यक्रम संपल्यानंतर घरी गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 08:21 AM2024-10-09T08:21:46+5:302024-10-09T08:26:14+5:30
शरद पवार गाडीजवळ उभे असल्याचे पाहून सुप्रिया सुळे चकीत झाल्या. ‘झाले ना, चला आता...’ एवढेच शरद पवार हे सुप्रिया सुळे यांना म्हणाले व त्यानंतर दोघेही कारमध्ये बसून निघून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्या पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. दिवसभर पक्ष कार्यालयात ठाण मांडून मुलाखती घेण्याचा त्यांचा स्टॅमिना भल्याभल्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे.
सोमवारी त्यांनी दिवसभर मुलाखती घेतल्या. रात्री त्यांना घरी जायचे होते, मात्र खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद सुरू असल्याचे पाहून ते शांतपणे आपल्या गाडीजवळ वाट पाहत थांबले. त्या आल्यानंतर रात्री ते एकत्रच मोदीबागेतील घरी गेले. त्यानंतर मंगळवारी तिसऱ्या दिवशीही पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
पत्रकार परिषद संपेपर्यंत बाहेरच उभे होते पवार
पवार व सुळे सोमवारी दुपारपर्यंत इंदापूरमध्ये होते. तिथून ते पुण्यात आले व दोघांनाही लगेच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमवेत मुलाखती सुरू केल्या. मार्केट यार्डमधील पक्ष कार्यालयात या मुलाखती सुरू आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत या मुलाखती सुरू होत्या. रात्री साडेसात वाजता खासदार सुळे खाली आल्या, त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक विशाल तांबे व युवा शाखेचे अध्यक्ष मेहबूब शेख होते. त्यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना बोलण्याची विनंती केली. ती मान्य करत सुळे यांनी तळमजल्यावरील हॉलमध्ये लगेचच संवाद सुरू केला. दिवसभरातील घडामोडींची माहिती त्या देत होत्या.
शरद पवार म्हणाले, ‘झाले ना, चला आता...’
- शरद पवारही त्यांचे काम संपल्यावर कार्यालयातून खाली उतरले. त्यावेळी त्यांची गाडी हॉलच्या प्रवेशद्वाराजवळच होती. खासदार सुळे पत्रकारांबरोबर बोलत असल्याचे त्यांना दिसत होते.
- मात्र, अतिशय शांतपणे त्यांनी गाडीजवळ उभे राहणे पसंत केले. एकदाही त्यांनी खासदार सुळे यांना कोणाबरोबर निरोप वगैरे काहीच पाठवला नाही. सुळे यांचे बोलणे संपल्यावर त्या आल्या.
- त्यावेळी पवार गाडीजवळ उभे असल्याचे पाहून त्याही चकीत झाल्या. ‘झाले ना, चला आता...’ एवढेच पवार त्यांना म्हणाले व त्यानंतर दोघेही गाडीत बसून निघून गेले. मोदीबाग येथील निवासस्थानी ते गेल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.