‘ससून’मध्ये पिता-पुत्राची ठाकुरगिरी! मुलाला प्रमाेट करण्यात अधिष्ठाता व्यस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 02:22 PM2023-10-18T14:22:16+5:302023-10-18T14:22:33+5:30
सर्जरी विभागात पिता-पुत्रांचाच ‘हाेल्ड, ललित पाटील याच विभागातून पळून गेल्याने येथील अनेक किस्से उघडकीस
पुणे : ससून रुग्णालयातून पलायन करून गेलेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्यावर ‘ससून’चे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांच्या युनिटमध्ये उपचार सुरू हाेते. या युनिटमध्ये अधिष्ठाता यांचा मुलगा व सर्जरी विभागाचे सहायक प्राध्यापक डाॅ. अमेय ठाकूर आणि इतर काही डाॅक्टरही आहेत. सर्जरी विभागावर मात्र या पिता-पुत्रांचाच एक हाती ‘हाेल्ड’ आहे. याच विभागांतर्गत उपचार घेत असलेला कैदी ललित पाटील पळून गेल्याने येथील अनेक किस्से उघडकीस येत आहेत.
आधी साेलापुरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता असलेले डाॅ. संजीव ठाकुर यांनी जानेवारी २०२३ मध्ये ससून रुग्णालयाचा अधिष्ठाता या पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी तातडीने त्यांचा मुलगा डाॅ. अमेय ठाकुर यांनाही ससूनमध्ये आणले. त्याआधी डाॅ. अमेयदेखील वडिलांसाेबत साेलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात हाेते. ससूनमध्ये विविध विभागांत अनेक लेक्चरर, सहायक प्राध्यापक, सहयाेगी प्राध्यापक, प्राध्यापक यांची पदे वर्षानुवर्षे रिक्त असताना अधिष्ठाता ससूनमध्ये आल्यावर त्यांनी तातडीने मुलगा डाॅ. अमेय यांना रूजू करून घेतले.
डाॅ. अमेय ठाकुर हे देखील सर्जन आहेत. ते सध्या ससूनच्या सर्जरी विभागात सहायक प्राध्यापक म्हणून वडिलांच्या युनिटमध्ये आहेत. परंतु, अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकुर हे मुलगा डाॅ. अमेय ठाकुर यांना प्रमाेट करण्यात काेणतीही कसर ठेवत नाहीत, अशी चर्चा आहे. त्यांनी मुलगा डाॅ. अमेय यांच्यासाठी सर्व काही देण्याचा यथाेचित प्रयत्न केला. मग, स्वतंत्र सुसज्ज ऑपरेशन थिएटर असाे की, कंपन्यांचे शस्त्रक्रिया करण्याचे साहित्य. त्यामध्ये त्यांनी काेणतीही कसर ठेवली नाही.
डाॅ. संजीव ठाकूर हे अधिष्ठाता असले तरी ते उत्तम सर्जनही आहेत. त्यांच्या हातावर हात मारलेले डाॅ. अमेय ठाकूर यांना लॅप्राेस्काेपिक हर्निया, बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करण्यासाठी इतर डाॅक्टरांच्या तुलनेत प्रचंड ‘फ्री हॅंड’ दिला गेला आहे. इतर सर्जन असलेल्या डाॅक्टरांना शस्त्रक्रिया करायला मिळाे अथवा ना मिळाे. परंतु, डाॅ. संजीव यांच्यासाठी पेशंट हमखास असतात. तसेच यथाेचित सर्व काही दिले जाते. अगदी शस्त्रक्रियेचे व्हिडिओ रेकाॅर्डिंगही केले जाते.
व्हिडीओ एडिटिंग मधून आणले ‘चैतन्य’
ससूनमध्ये ज्या काही महत्वाच्या शस्त्रक्रिया हाेतात त्यांचे सर्वांचे व्हिडीओ चित्रीकरण, एडिटिंग करून त्या व्हिडीओमध्ये ‘चैतन्य’ आणण्याचे काम करण्यासाठी एका खास एजन्सीचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, ते व्हिडीओ दाखवण्यासाठी बीजे सह ससून रुग्णालयात लाखाे रूपयांचे भलेमाेठे एलईडी टीव्ही संच खरेदी करून लावण्यात आले आहेत. त्यावर हे एडिट केलेले व्हिडीओचे सादरीकरण केले जाते आणि अशा प्रकारे याेग्य रितीने मार्केटिंगही केले जाते.
त्या ओटी ला कुलूप?
दरम्यान ससून रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर अधिष्ठाता व मुलगा डाॅ. अमेय यांच्यासाठी कंपन्यांच्या डाेनेशनमधुन स्वतंत्र व सुसज्ज ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आले आहे. मात्र हे थिएटर सर्व डाॅक्टरांसाठी नसून केवळ डाॅ. ठाकुर पितापुत्रांसाठी आहे. येथे खास रुग्णांचे ऑपरेशन केले जाते आणि ऑपरेशन झाल्यावर त्याला कुलूप लावले जात असल्याचे बाेलले जात आहे.
सर्जरी विभाग जाेमात
सध्या ससून रुग्णालयात अधिष्ठाता यांचा आवडता सर्जरी विभागच जाेमात आहे. अपवाद वगळता इतर विभाग मात्र समस्यांचे आगार बनलेले आहेत. काही विभागांना राजकारणाने ग्रासले आहे कर काही विभागात मणुष्यबळ नाही. तसेच त्यांना हव्या त्या सुविधा देखील मिळत नाहीत. परंतू, सर्जरी विभागाला सध्या सुगीचे दिवस असून त्यांना हवे ते सर्व काही मिळते अशी ससूनमध्ये दबक्या आवाजात कुजबूज रंगत आहे.