समुपदेशनामुळे बाप-लेकाची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 01:54 AM2019-03-17T01:54:04+5:302019-03-17T01:54:22+5:30
नवरा-बायकोच्या भांडणात दोन वर्षांचा मुलगा वडिलांच्या मायेपासून दुरावला जातो. वडिलांना मुलाला भेटू दिले जात नव्हते. अखेर कौटुंबिक न्यायालयामध्ये समुपदेशनाद्वारे या दुरावलेल्या बाप-लेकाची भेट घडवून आणली जाणार आहे.
पुणे - नवरा-बायकोच्या भांडणात दोन वर्षांचा मुलगा वडिलांच्या मायेपासून दुरावला जातो. वडिलांना मुलाला भेटू दिले जात नव्हते. अखेर कौटुंबिक न्यायालयामध्ये समुपदेशनाद्वारे या दुरावलेल्या बाप-लेकाची भेट घडवून आणली जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी दोन तास त्यांना महाराणा प्रताप गार्डनमध्ये भेटता येणार आहेत. विजयला जून महिन्यात मुलाचा वाढदिवसही साजरा करता येणार आहे.
विजय व संजना (नावे बदलली ) यांचा नोव्हेंबर २०१३ मध्ये विवाह झाला. विवाहानंतर कौटुंबिक कारणे तसेच संपत्तीवरून वाद सुरू झाले. दरम्यान त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पण वाद सुरूच राहिल्याने संजनाने विजय विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. विजयला मुलालाही भेटण्यास मज्जाव केला. प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने त्याने मुलाचा काही कालावधीसाठी ताबा मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. आपली पत्नी तिच्या आईच्या सांगण्यावरून वागत असल्याचा आरोप विजयने केला. तर मुलावर विजय काळी जादू करतो, असे सांगत संजनाने मुलाचा ताबा त्याला देण्यास विरोध दर्शविणारा अर्ज दिला. न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर दोघांचे समुपदेशन करण्यात आले. यामध्ये दोघांनी तडजोड करण्यासाठी संमती दर्शविली.