पिता-पुत्राची जोडी एसटीत...!; पुण्यातील वीर यात्रेने पूर्ण केली एकत्र काम करण्याची इच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:11 PM2018-02-13T12:11:27+5:302018-02-13T12:17:12+5:30
विविध क्षेत्रांमध्ये पिता-पुत्रांच्या जोड्या अनेकदा पाहायला मिळतात. अशीच आगळीवेगळी जोडी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) वीर यात्रेनिमित्त सोडलेल्या जादा बसमध्ये जुळून आली.
पुणे : विविध क्षेत्रांमध्ये पिता-पुत्रांच्या जोड्या अनेकदा पाहायला मिळतात. अशीच आगळीवेगळी जोडी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) वीर यात्रेनिमित्त सोडलेल्या जादा बसमध्ये जुळून आली. वडील चालक, तर मुलगा वाहक असून यात्रेनिमित्त दोघांना एकाच बसमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
एसटीतर्फे वीर यात्रेनिमित्त ६ ते १० फेब्रुवारीदरम्यान जादा गाड्या सोडल्या होत्या. या गाड्यांमध्ये अशोक व अमोल माळशिकारे या पिता-पुत्रांनी एकाच बसमध्ये काम केले. अमोल यांचे वडील बारामती आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत, तर अमोल हे सासवड आगारात वाहक. दोघेही बारामती येथे राहात असून, तेथूनच ते आपापल्या आगारांत कामाला जातात. वडील लवकरच सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा अमोल यांनी व्यक्त केली होती. मात्र, गाड्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे हा योग जुळून येत नव्हता.
वीर यात्रेमुळे त्यांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली. दोघांना एकाच बसमध्ये बारामती ते कोंढे हा मार्ग दिला होता. एकाच बसमध्ये अशा प्रकारे वडील व मुलाने सेवा दिल्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. अशोक माळशिकारे हे २८ वर्षांपासून एसटीत कार्यरत आहे. अमोल हे तीन वर्षांपासून वाहक म्हणून कार्यरत आहे. दोघांनाही एकाच गाडीमध्ये काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी नियोजन केल्याचे सासवडचे आगारप्रमुख पृथ्वीराज भुताळे यांनी सांगितले.