मुलाला मारहाण करत असल्याचे पाहून वडिलांचा धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 02:56 AM2018-05-08T02:56:16+5:302018-05-08T02:56:16+5:30
चौकशीसाठी पोलीस चौकीत बोलावलेल्या मुलाला पोलीस पट्ट्याने मारहाण करीत असल्याचा धक्का सहन न होऊन वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जनवाडी पोलीस चौकीत रविवारी रात्री घडली़
पुणे - चौकशीसाठी पोलीस चौकीत बोलावलेल्या मुलाला पोलीस पट्ट्याने मारहाण करीत असल्याचा धक्का सहन न होऊन वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जनवाडी पोलीस चौकीत रविवारी रात्री घडली़
मोरेश्वर काळूराम मेंगडे (वय ६१, रा़ गोपाळकृष्ण मंदिराजवळ, गोखलेनगर) असे त्यांचे नाव आहे़ याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद करुन तपास करण्यात येत असून संबंधित पोलीस उपनिरीक्षकाची जनवाडी पोलीस चौकीतून बदली करण्यात आली आहे़
दोन दिवसांपूर्वी मोरेश्वर मेंगडे यांचा मुलगा अमोल मेंगडे (वय ३४) हे कुटुंबासह जात असताना संदीप शुक्ला याने दारूच्या नशेत अमोलच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला़ त्यात अमोल व त्याचे भांडणे झाले़ दुसऱ्या दिवशी अमोल याने चतु:श्रृंगी पोलिसांना मारहाण झाल्याची तक्रार दिली़ जनवाडी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक बी़ व्ही दोंडमिसे यांनी रविवारी रात्री अमोलला चौकशीला बोलावले होते़ त्याच्या मागोमाग त्याचे वडिल मोरेश्वर मेंगडेही आले़ तेव्हा त्यांच्यासमोर अमोलला पोलिसांकडून पट्ट्याने बेदम मारहाण केली जात होती़ त्यांना हा धक्का सहन न झाल्याने चक्कर येऊन ते पडले़ रुग्णालयात नेले़ तेथे त्यांचा मृत्यु झाला़