मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांचाही झाला मृत्यू
By admin | Published: June 1, 2017 01:49 AM2017-06-01T01:49:06+5:302017-06-01T01:49:06+5:30
शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या व अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अमितने छातीत दुखूू लागल्याने उपचारासाठी नेत असताना
लोकमत न्यूज नेटवर्क
नीरा : शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या व अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अमितने छातीत दुखूू लागल्याने उपचारासाठी नेत असताना वडिलांच्या मांडीवरच आपला प्राण सोडला. हा धक्का सहन न झाल्याने वडिलांनाही हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचीही प्राणज्योत मालवली. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना सोमवारी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील इंदोली गावात घडली.
मोहन चितू कोळपे (वय ६४) व त्यांचा शिक्षक मुलगा अमित ( वय ३०) असे या घटनेत मृत झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. एकाच दिवशी काही क्षणांच्या अंतरात दोघांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत वडील हे येथील पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्योतिर्लिंग हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक होते. तेव्हापासून कोळपे कुटुंब पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथे राहत होते. सध्या आईवडील मूळ गावी इंदोली येथे राहत असून, एक मुलगा अमोल गुळूंचे येथे व मृत मुलगा अमित सातारा येथे शिक्षक म्हणून कार्यरत होता.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार: अमित, भाऊ अमोल आपल्या मूळगावी इंदोली (ता. कराड, जि .सातारा ) येथे आईवडिलांकडे उन्हाळी सुटीसाठी गेले होते. अमित सातारा येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता.
सोमवारी ( ता.२९) रोजी त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आपल्या वडिलांच्या मांडीवरच अमितने प्राण सोडला. हा धक्का वडिलांना सहन न झाल्याने हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
निधीअभावी काम बंद
अतिशय खडतर परिस्थितीतून मोहन कोळपे यांनी सुरुवात केली. गरिबीतून बी.एड्.चे शिक्षण पूर्ण केले. नोकरी मिळेपर्यंत दूध डेअरीतही काम केले. काही दिवसांनी पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळात त्यांना नोकरीची संधी मिळाली. पुढे गुळूंचे गावात राहून कोळपे सरांनी माध्यमिक विद्यालयात आपली सेवा पूर्ण केली. दोन्ही मुलांचे शिक्षण येथेच झाले. ३१ वर्षे ८ महिने एवढी प्रदीर्घ सेवा बजावली.