जमिनीच्या हव्यासापोटी मुलाकडूनच बापाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 05:04 PM2018-05-21T17:04:36+5:302018-05-21T17:07:36+5:30
जमीन विक्रीच्या कागदावर सही करत नसल्याने मुलानेच आपल्या मठात सेवेकरी असलेल्या बापाचा खून केला.
यवत: भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला असणाऱ्या ओम शांती मठात झालेल्या खुन हा जमिनीच्या हव्यासापोटी करण्यात आला असून तो मयत व्यक्तीच्या मुलानेच केला असल्याचे गुन्हा पुणे ग्रामीणच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासात उघडकीस आले आहे. सुखराज दगडू टेमगिरे (वय ४० रा.भरातगाव ता.दौंड जि.पुणे) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. ७ मे रोजी भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या ओम शांती बाबा मठातील सेवेकरी दगडू लक्ष्मण टेमगिरे (वय ७० रा.भरतगाव ता.दौंड ) यांचा अज्ञात इसमाने शस्त्राने डोक्यात वार करून खून केला होता.
गुन्हे शाखेच्या विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मयत दगडू टेमगीरे हे अत्यंत मनमिळावू चांगल्या स्वभावाचे तसेच सांप्रदायिक पंथाचे व धार्मिक असल्याने त्यांचे गावात कोणाशी वैर नव्हते. त्यांचा लहान मुलगा सुकराज (वय ४०) यास दारूचे व्यसन असून त्याने वडिलांच्या नावे असलेली जमीन ही त्याच गावातील एका इसमास विकण्याचे कबूल करून त्याच्याकडून विसार रक्कम घेतली होती. परंतु वडिलांचा जमीन विकण्यास विरोध असल्याने ते कागदपत्रावर सही करत नव्हते. यातूनच आरोपी सुखराज टेमगिरे याने सायंकाळी मठात वडील पालथे झोपलेले असताना त्या संधीचा फायदा घेत लोखंडी गजाने वडिलांच्या डोक्यात वार केले. वडील प्रतिकार करू लागल्यावर त्यांच्या तोंडावर उशी ठेऊन त्यांचा खून केला. पोलिसांनी आरोपीकडे कसून चौकशी केली असता जमिनीच्या हव्यासापोटी स्वत:च्याच वडिलांचाच खून केल्याचे कबूल केले.
पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संदिप पखाले व गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. यात गुन्हे शाखेचे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, दयानंद निम्हण, अक्षय जावळे यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणण्यात मोलाची कामगिरी केली आहे.