वडिलांचं पार्थिव रात्रभर पार्किंगमध्ये ठेवून 'तो' घरात निवांत झोपला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 02:59 AM2020-01-03T02:59:14+5:302020-01-03T07:08:05+5:30
पुण्याच्या उच्चभ्रू सोसायटीतील धक्कादायक घटना
- अभय नरहर जोशी
पुणे : येथील एक उच्चभ्रू सोसायटी... त्यातील एक ९९ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक... मुलगा परदेशात स्थायिक... वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतो... त्यांचे निधन होते... दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करायचे ठरते... आदल्या दिवशी मुलगा त्यांचे पार्थिव सोसायटीत आणतो; पण ते घरात नेतच नाही... कुणालाही स्वत:हून न सांगता ते रात्रभर पार्किंगमध्येच ठेवतो अन् दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार उरकून टाकतो...
पिता-पुत्राच्या नात्याला काळिमा फासणारी, सुन्न करणारी एका उच्चभ्रू सोसायटीतील ही धक्कादायक घटना. दोन-तीन वर्षांपूर्वी या ज्येष्ठ नागरिकाची पत्नी निवर्तली. सधन परिस्थिती. मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी आपल्या इस्टेटीचा काही भाग त्यांनी विकला व या सोसायटीतील वन बीएचके फ्लॅटमध्ये ते राहू लागले. मुलगा मात्र त्यांना एकटे ठेवून परदेशात स्थायिक झाला. त्यामुळे त्याच्या वडिलांना बरेच शारीरिक आणि मानसिक क्लेश झाले. सोसायटीतील शेजारीपाजारी त्या एकट्या आजोबांना मदत करीत...परंतु इस्टेटीवर डोळा असल्याने ते त्यांना मदत करीत असल्याचा आरोप या मुलाने केला. त्यामुळे शेजारीपाजारीही त्यांना मदत करण्यास कचरू लागले. या आजोबांना त्यांच्या मुलाने यथावकाश वृद्धाश्रमात ठेवले. काही दिवसांपूर्वी त्यांचे तिथेच निधन झाले.
सोसायटीत ही बातमी समजली. सोसायटीत ते लोकप्रिय असल्याने त्यांचे पार्थिव वृद्धाश्रमातून सोसायटीत आणावे, असे शेजाºयास वाटत होते. आजोबांचे अंत्यदर्शन घ्यावे व अंत्यसंस्कार कधी आहेत, याची माहिती घेण्यासाठी शेजाºयाने त्यांच्या मुलाशी संपर्क साधला. तो पुण्यात आला होता. त्या मुलाने अंत्यसंस्कार दुसºया दिवशी असल्याची माहिती दिली अन् वडिलांचे पार्थिव कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवल्याचे सांगितले. शेजाºयाने ‘पार्थिव कुठे ठेवले आहे? आम्ही दर्शन घेतो,’ असे विचारून अंत्यसंस्कारांसाठी आवश्यक बाबींसाठी काही मदत, सहकार्य करण्याची इच्छाही व्यक्त केली. त्या मुलाने जवळच्याच एका कोल्ड स्टोअरेजमध्ये पार्थिव ठेवल्याची माहिती दिली. रात्री उशीर झाल्यानंतरही आजोबांच्या घरी नातलगांची काहीच हालचाल न दिसल्याने शेजाऱ्यांनी त्या मुलाला ‘कोणत्या कोल्ड स्टोअरेजमध्ये पार्थिव ठेवले आहे?’ असे खोदून विचारले. तेव्हा त्याने धक्कादायक खुलासा केला, की ‘तुम्हाला गॅलरीतूनही पार्थिव पाहता येईल!’ गोंधळलेले शेजारी गॅलरीतून खाली पाहू लागले, तेव्हा त्यांना धक्काच बसला! वडिलांचे पार्थिव ठेवलेली शववाहिका पार्किंगमध्येच ठेवून तो मुलगा आपल्या फ्लॅटमध्ये झोपायला निघून गेला होता. त्या शववाहिकेच्या खिडक्या वगैरे उघड्याच होत्या.
अंत्यसंस्कारही उरकले
या सोसायटीतील काही पार्किंगमध्ये रस्त्याचा काही भाग असल्याने शववाहिकेसाठी सोसायटीच्या सुरक्षारक्षक किंवा परवानगीची गरज भासली नाही. बहुसंख्य रहिवाशांना याची कल्पनाही नव्हती. दुसºया दिवशीही हे पार्थिव परस्पर कधी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले, हे समजू शकले नाही.