मुलीला पाण्यात फेकून पित्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 07:52 AM2017-07-26T07:52:52+5:302017-07-26T18:38:00+5:30
आठ महिन्याच्या लेकीसह वडील खडकवासला धरण परिसरात बुडाले असल्याचे सोमवारी प्रथमदर्शी वाटले असले तरी पोटच्या मुलीला धरणात फेकून बापाने स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे : आठ महिन्याच्या लेकीसह वडील खडकवासला धरण परिसरात बुडाले असल्याचे सोमवारी प्रथमदर्शी वाटले असले तरी पोटच्या मुलीला धरणात फेकून बापाने स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सुनील विजय दणाणे (३२) असे मृत व्यक्तिचे नाव आहे. त्याचा मृतदेह सापडला असून मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सुनील पत्नी गौरी दुणाणे समवेत त्यांच्या जान्हवी या आठ महिन्यांच्या मुलीसह खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला असणा-्या पिकनिक स्पॉटवर सोमवारी सायंकाळी फिरायला आला होता. यावेळी त्याने पत्नीकडून मुलीला हिसकावून घेत तिला पाण्यात फेकून दिले. त्यानंतर स्वत: देखील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होता. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने नदीपात्रात दोघेही दिसेनासे झाले. पत्नीने आरडाओरडा केला असता नागरिक तिथे पोहोचले.
नागरिकांनी अग्निशामक
दलास दिलेल्या माहितीनुसार, धरणातून पाणी सोडलेल्या ठिकाणी गेल्यावर सुनील याने पत्नीकडून बाळाला हिसकावून घेतले. काही समजण्यापूर्वीच त्यांनी त्या बाळास पाण्यात फेकून दिले. तसेच स्वत: देखील पाण्यात उडी मारली.
बाप आणि मुलगी खडकवासला धरण परिसरात बुडाले असल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. दोघांचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. मंगळवारी सकाळी ११ वाजता पुन्हा जवानांनी शोध घेतला असता धरणामध्ये एका झाडाच्या बाजूला सुनील याचा मृतदेह सापडला. मात्र मुलीचा सापडू शकला नाही. सुनील याने मद्यप्राशन केले होते. नशेमध्ये त्याने हे कृत्य केल्याची चर्चा आहे. तांडेल शिवाजी मुंजमळे, फायरमन प्रमोद मरळ, निलेश पोफळे, शिवाजी आवळे, रमेश चव्हाण आणि ड्रायव्हर सातपुते यांनी ही कामगिरी केली.