अपयश हा प्रशिक्षणाचा भाग - रघुनाथ माशेलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 03:19 AM2018-01-02T03:19:45+5:302018-01-02T03:19:49+5:30
तरुणांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठ्या आकांक्षा ठेवत कठोर परिश्रम करावे. तसेच अपयश आले तरी खचून न जाता त्याकडे प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून पाहावे, असा संदेशही जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सोमवारी दिला.
पुणे : तरुणांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठ्या आकांक्षा ठेवत कठोर परिश्रम करावे. तसेच अपयश आले तरी खचून न जाता त्याकडे प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून पाहावे, असा संदेशही जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सोमवारी दिला. तसेच पुण्याने माझे लाड केले आणि मला मोठे केले. मी माशेलकर नसून पुणेकरच आहे. शेवटच्या श्वासापर्यंत माझी पुण्यातच राहण्याची इच्छा आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, भारती अभिमत विद्यापीठ, सिम्बायोसिस, डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठ, एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी व इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटी यांच्या वतीने डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञान-विज्ञान-ब्रह्मऋषी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शां.ब. मुजुमदार, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, भारती विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, वैशाली माशेलकर, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल कराड, सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, डॉ. जय गोरे, डॉ. राजेंद्र्र शेंडे, तुळशीराम कराड, पंडित वसंतराव गाडगीळ, फिरोज बख्त अहमद, माजी कुलगुरू डॉ.एस.एन. पठाण आदी उपस्थित होते. पुण्याने मला खूप प्रेम दिले. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत मला पुण्यातच राहणे आवडेल, असे नमूद करून डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, ऊर्जा केंद्रित केल्यावर काहीही घडू शकते. तसेच, भारत देश एक झाला, तर या विश्वात काहीही करू शकतो. पण त्यासाठी कठोर मेहनत व परस्पर सहकार्य असावे लागेल. त्याचप्रमाणे पुढील काळात दुर्लक्षित मूल्य समाजात रुजविण्यासाठी काम केले जाणार आहे.
डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, शनिवारवाड्यावर विज्ञानमहर्षी माशेलकर यांचा सत्कार होत आहे ही अलौकिक घटना आहे.
कार्यक्रमात डॉ. विद्या येरवडेकर, राहुल कराड, विश्वजित कदम, पं.वसंत गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले.
माशेलकर हे सकारात्क ऊर्जेचे प्रतीक आहेत.‘माशेलकर प्लस’ हे प्रभावी औषध आहे. ते पुण्याचे ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर आहेत. त्यांनी जगात विज्ञानच्या क्षेत्रात भारताचे नाव वरच्या स्थानावर नेऊन ठेवले.
- डॉ. शां. ब. मुजुमदार
सरस्वती नगरीमध्ये ऋषितुल्य वैज्ञानिकाचा सत्कार होणे, ही देशासाठी एक ऐतिहासिक घटना आहे. - डॉ. विजय भटकर
ज्ञान-विज्ञान व अध्यात्माच्या आधारे भारत विश्वाला शांतीचा मार्ग दाखवील. डॉ. माशेलकरांच्या रूपाने भारताला मानवतावादी वैज्ञानिक मिळाला आहे. - डॉ. विश्वनाथ कराड