ग्रामसेवकांवर सदोष मनुष्यवधाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:32+5:302021-06-01T04:08:32+5:30
बारामती: झारगडवाडी येथील गायरान क्षेत्रात अवैध उत्खनन झाले असून, २०० ते २२० ब्रास मुरुमाची चोरी झाली आहे. या ...
बारामती: झारगडवाडी येथील गायरान क्षेत्रात अवैध उत्खनन झाले असून, २०० ते २२० ब्रास मुरुमाची चोरी झाली आहे. या मुरूमचोरीमुळे झालेल्या खड्ड्यात ग्रामपंचायतीने सांडपाणी सोडल्याची येथील ग्रामस्थांची तक्रार आहे. यामध्ये आतापर्यंत दोन निष्पाप नागरिकांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच सबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत या काही ग्रामस्थांनी त्यांच्या स्वाक्षऱ्यांचे महसूल नायब तहसीलदारांसह पोलीस ठाण्याला निवेदन दिले आहे.
झारगडवाडी येथील सार्वजनिक वनीकरण क्षेत्रातील अवैध उत्खनन बुजविणे, तसेच गावातील भूमिगत गटारीच्या सांडपाण्याची नागरी लोकवस्तीपासून दूर योग्य ठिकाणी व्यवस्था करणेबाबत वेळोवेळी तक्रार करण्यात आली. मात्र, या तक्रारीची विनंती अर्जाची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच, मागील वर्षी ऑगस्ट २०२० रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी देखील योग्य कारवाईचे आदेश दिले. मात्र, त्यांच्या आदेशाला देखील प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली. संबंधित उत्खननात यापूर्वी डोर्लेवाडी गावातील एका नागरिकाचा बळी गेला आहे. त्यानंतर देखील ग्रामपंचायत प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. या खड्डयात मृत्यूची मालिका आणखी सुरूच असल्याचे या ग्रामस्थांचे म्हणने आहे.
दिनांक २४ मे २०२१ रोजी दुपारी १२ ते २ च्या दरम्यान जनाबाई मारुती कांबळे (वय ७५) या वृद्ध महिलेचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. या गंभीर घटनेची माहिती सरपंच, पोलीस पाटील यांना दिली. मात्र, येथील ग्रामसेवकांना या घटनेनंतर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बंद असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. ग्रामप्रशासनातील मुख्य शासकीय अधिकाऱ्याने अशा गंभीर घटनेची दखल न घेता फोन बंद ठेवणे योग्य नाही. अधिकारी या नात्याने संबंधित वनीकरण क्षेत्रातील अवैध खड्डा खोदण्यात ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्यकारिणीच्या चुकीच्या निर्णयावर अंमलबजावणी करणारे ग्रामसेवक सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर योगेश नाळे, दादासो आगम, अमोल यादव, तेजस चिरमे, ऋषिकेश भापकर, तुषार झगडे, सचिन आगम, धनंजय कुंभार, विशाल गदादे, अनिल तरटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.