FC Road Drugs Party : आतापर्यंत सात जण अटकेत; तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह चौघांचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:04 AM2024-06-24T10:04:24+5:302024-06-24T10:05:00+5:30

आतापर्यंत या प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. 

FC Road Drugs Party Seven arrested so far suspension of four including officers and employees | FC Road Drugs Party : आतापर्यंत सात जण अटकेत; तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह चौघांचे निलंबन

FC Road Drugs Party : आतापर्यंत सात जण अटकेत; तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह चौघांचे निलंबन

किरण शिंदे,  पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरिक्षक अनिल माने आणि सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी दोन बीट मार्शलला देखील या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. तर आतापर्यंत या प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. 

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी, संतोष विठ्ठल कामठे, सचिन विठ्ठल कामठे, उत्कर्ष कालिदास देशमाने, योगेंद्र गिरासे, रवी माहेश्वरी, अक्षय दत्तात्रय कामठे, दिनेश मानकर आणि मोहन राजू गायकवाड या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

एफसी रोडवरील एका पबच्या शौचालयात अंमली पदार्थांचे सेवन काही युवक करत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रविवारी एकच खळबळ उडाली. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच या व्हिडिओमध्ये दिसणारा वेळ हा मध्यरात्री दीड नंतरचा असल्यामुळे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटे पाचपर्यंत पब सुरू असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे.

दरम्यान, ड्रग्स पार्टी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण सुरू आहे.  या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत. तर त्या हॉटेलच्या मॅनेजरसह ७ जणांना ताब्यात घेतले आहे. तर उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल सील करण्यात आले असून हॉटेलमधील सर्व सामग्री जप्त करण्यात आली आहे.

Web Title: FC Road Drugs Party Seven arrested so far suspension of four including officers and employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.