कोंढव्यात एफडीएची कारवाई
By admin | Published: June 26, 2017 04:01 AM2017-06-26T04:01:00+5:302017-06-26T04:01:00+5:30
कोंढवा येथील गोकुळनगर परिसरात भेसळयुक्त तूप व लोणी तयार केले जात असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढवा येथील गोकुळनगर परिसरात भेसळयुक्त तूप व लोणी तयार केले जात असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई केली. एफडीएने भेसळयुक्त अन्नपदार्थांचे १४ नमुने ताब्यात घेतले आहेत. शनिवारी रात्री साडेतीनपर्यंत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही कारवाई केली.
कोंढव्यातील एका खासगी इमारतीत भाडे तत्त्वावरील खोलीमध्ये भेसळयुक्त तूप व लोणी तयार केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर कोंढव्यातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने गोकुळनगर येथील इमारतीत छापा टाकला.
त्यात गाईचे १ लाख ४९ हजार ५५० रुपये किमतीचे ५३१ किलो तूप, म्हशीचे १ लाख ३९ हजार ७९२ रुपये किमतीचे ५७६ किलो तूप तसेच
२८ हजार ८९६ रुपये किमतीचे
१९६ किलो लोणी (बटर), १ हजार ७७६ रुपये किमतीचे १७ किलो रिफार्इंड सोयाबीन तेल, ३७ हजार ८२९ रुपये किमतीचे ३९४ किलो वनस्पती तेल असा एकूण ३ लाख ५७ हजार ८४३ रुपये किमतीचा मालसाठा जप्त करण्यात आला.
एफडीएचे अधिकारी एस. पी. शिंदे, प्रशांत गुंजाळ, संतोष सावंत, अजित मैत्रे, गणपत कोकणे, देवानंद वीर यांनी रात्री साडेतीनपर्यंत स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली.