एफडीएकडून गावोगावी परवाना मोहीम सुरू; विनापरवाना अन्न व्यवसाय केल्यास ‘फौजदारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 01:44 PM2018-01-19T13:44:46+5:302018-01-19T13:46:52+5:30
महाराष्ट्र अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमने २०११ अंमलात आलेला असल्याने या कायद्यान्वे अन्न व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी गावोगावी मोहीम राबविण्यात येत आहे.
पुणे : महाराष्ट्र अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमने २०११ अंमलात आलेला असल्याने या कायद्यान्वे अन्न व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी गावोगावी मोहीम राबविण्यात येत आहे.
विनापरवाना अन्न व्यवसाय केल्यास संबंधितांवर फौजदारी खटला दाखल केला जातो. तसेच, त्यांना ६ महिने कारावास व ५ लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी परवाना घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे.
कायद्याच्या कलम ३ (१) (एन)मध्ये व्यावसायिकाची व्याख्या देण्यात आली असून, त्यात फळविक्रेता, भाजीविक्रेता, मांस-अंडी विक्रेता, उपाहारगृहे, मिठाई उत्पादक- विक्रेते, वाईन, बिअर शॉप, पाणीपुरी, भेळविक्रेता, हॉटेल, बेकरी उत्पादक, आॅईल मिल इत्यादींचा समावेश आहे.
प्रशासनाने कायद्यातील तरतुदीनुसार परवाना नसताना अन्न व्यावसायिकाला अन्नपदार्थांची विक्री केल्यामुळे पुरवठादार अन्न व्यावसायिकाला ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे.
परवाना नसलेल्या व्यावसायिकांनी आॅनलाइन नोंदणी करून रीतसर अर्ज अपलोड करावा. अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गावोगावी जाऊन परवाना शिबिर आयोजिले आहे, असे एफडीएकडून कळविण्यात आले आहे.