अस्वच्छ हॉटेलना एफडीएची नोटीस
By Admin | Published: January 2, 2015 12:58 AM2015-01-02T00:58:04+5:302015-01-02T00:58:04+5:30
अन्न आणि औषध प्रशासनाने थर्टी फर्स्टच्या दिवशी पुणे विभागातील ८९ रेस्टॉरंट, हॉटेलची तपासणी केली असून, यातील बहुतांश हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळून आली
पुणे : अन्न आणि औषध प्रशासनाने थर्टी फर्स्टच्या दिवशी पुणे विभागातील ८९ रेस्टॉरंट, हॉटेलची तपासणी केली असून, यातील बहुतांश हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळून आली असून, त्यांना नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. त्यात पुणे शहरातील कोथरूड, डेक्कन, जे. एम. रस्त्यासह अन्य भागांतील हॉटेल, रेस्टॉरंटचादेखील त्यात समावेश आहे.
अन्नसुरक्षा कायद्याद्वारे राज्यातील प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ व सकस अन्नाचा पुरवठा होईल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी एफडीएवर आहे. नाताळ व ३१ डिसेंबरला राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट व केक शॉपची तपासणी करण्याचे आदेश एफडीएचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दिले होते. सेलिब्रेशनसाठी खवय्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. अशा वेळी खाद्यपदार्थांत भेसळ होण्याची शक्यता असते. तसेच अनेकदा खाद्यान्नाचा दर्जादेखील राखला जात नाही. त्या पार्श्वभूमीवर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमधील हॉटेलची तपासणी केली.
विभागात ८९ हॉटेलची तपासणी करण्यात आली असून, त्यातील बहुतांश हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळून आली आहे. त्या कारणास्तव या हॉटेल, रेस्टॉरंट, बारला नोटिसा पाठविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पुणे शहरातील कोथरूड, डेक्कन, सातारा रस्ता, जे.एम. रस्ता आदी भागातील हॉटेल, रेस्टॉरंटचा समावेश असल्याची माहिती एफडीएचे सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी दिली.
तपासणी केलेल्या ८९ हॉटेलमधून ५५ पेक्षा अधिक खाद्यपदार्थांचे, तसेच कच्चामालाचे नमुने घेण्यात आले असून, पुढील तपासणीसाठी ते आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल काही दिवसांत येण्याची अपेक्षा आहे. सोलापुरात ७, साताऱ्यात ३०, सांगलीतून सहा तर कोल्हापुरातील ४४ हॉटेलची तपासणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.