एफडीएकडून पुणे जिल्ह्यात तब्बल ३ कोटींचा गुटखा जप्त; बंदी असूनही सर्रास विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 06:44 PM2018-01-13T18:44:44+5:302018-01-13T18:50:50+5:30
राज्यात गुटखा बंदी असून गेल्या वर्षभरात अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) पुणे जिल्ह्यात तब्बल ३ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला.
पुणे : राज्यात गुटखा बंदी असून गेल्या वर्षभरात अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) पुणे जिल्ह्यात तब्बल ३ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. मात्र, पुणे शहरासह, उपनगर परिसरात व जिल्ह्यातील ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी गुटख्याचा काळाबाजार सुरूच असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे गुटखा बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधितांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
गुटख्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने महाराष्ट्रासह देशात २५हून अधिक राज्यात गुटख्यावर बंदी घालण्यात आली. परंतु, महाराष्ट्राशेजारील राज्यांमधून पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये गुटख्याचा मोठ्याप्रमाणावर काळाबाजार केला जात आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी वेळेवेळी कारवाई करून गुटख्याचे अनेक ट्रक, टेम्पो जप्त केले आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल ३ लाख रुपयांचा गुटखा एकट्या पुणे जिल्ह्यात पकडला गेला. त्यातही डिसेंबर महिन्यात येरवडा परिसरात सुमारे ६८ लाखांचा गुटखा पकडण्यात आला, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. परंतु, येरवड्यात अजूनही सर्रास गुटख्याची विक्री केली जात असल्याचा आरोप स्थानिक आमदार जगदीश मुळीक यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
मुळीक म्हणाले, गुटखा बंदी असूनही येरवडा परिसरातील अनेक पान टपऱ्यांवर गुटख्याची बेकायदेशीरपणे विक्री केली जात आहे. एफडीएकडून वारंवार कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गुटख्याचा अवैध व्यापार करणाऱ्या गुंडांच्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यामुळे गुटख्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे. परंतु, त्याबाबत अद्याप गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. गुटख्यासंबंधी मी विधान सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी एफडीएने केवळ १२ ते १३ ठिकाणचा गुटखा जप्त केल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, याबाबत पुन्हा मी पाठपुरावा करून आढावा घेणार आहे.