आंबिल ओढ्याच्या काठावरील नागरिकांमध्ये धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:11 AM2021-02-15T04:11:04+5:302021-02-15T04:11:04+5:30
पुणे : आंबिल ओढ्याच्या सीमाभिंतीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने पालिकेने या कामाची फेरनिविदा काढली. परंतु, संबंधित ठेकेदार न्यायालयात ...
पुणे : आंबिल ओढ्याच्या सीमाभिंतीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने पालिकेने या कामाची फेरनिविदा काढली. परंतु, संबंधित ठेकेदार न्यायालयात गेल्याने न्यायालयाने पालिकेला म्हणणे सादर करण्याची सूचना केली आहे. तोपर्यंत काम ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे ओढ्याच्या काठावरील नागरिकांमध्ये धास्ती वाढली आहे. पालिकेच्या चुकीम उळे आम्हाला पुन्हा पुराचा सामना करावा लागू नये. पावसाळ्यापुर्वी हे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २५ सप्टेंबर २०१९ रोजी आंबिल ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे काठावरील वसाहती, सोसायट्यांमध्ये पाणी घुसले होते. सीमाभिंती कोसळल्या होत्या. अनेकांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे ओढ्याची खोली वाढविणे, गाळ काढणे, पुराचे पाणी नागरी भागात पुन्हा घुसू नये म्हणून सीमािभंत बांधणे अशा मागण्या स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी केल्या होत्या. कल्व्हर्टची उंची वाढवून बांधकाम करण्याचीही मागणी करण्यात आली होती.
महापालिकेने सीमाभिंत बांधण्यासाठी निविदा काढली होती. प्रशासनाने विकास आराखड्याप्रमाणे ओढ्याची मोजणी करून काम सुरू करावे, अशी भूमिका घेतली होती. मात्र ठेकेदाराने काम करण्यात दिरंगाई केली. त्याला नोटीस बजावण्यात आल्यानंतरही काम सुरु झाले नाही. त्यामुळे आधीच्या निविदा रद्द करुन पुनर्निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्याची मुदत ४ फेब्रुवारी रोजी संपली. शुक्रवारी निविदा उघडण्यापुर्वीच ठेकेदाराने या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
====
भाजपाच्या फ्लेक्सवर झळकलेल्या ठेकेदाराने न्यायालयात धाव घेत या कामाला स्थगिती मिळविली आहे. ठेकेदार आणि पालिका यांच्या वादात नागरिकांचे नुकसान होऊ नये. पावसाळ्यापुर्वी सीमाभिंतीचे काम व्हायला हवे. वारंवार मागणी करुनही भ्रष्टाचारामुळे हे काम मार्गी लागत नाही.
- अश्विनी कदम, नगरसेविका