सिमेंटच्या रस्त्यांचे नाले होण्याची भीती
By admin | Published: May 16, 2017 07:03 AM2017-05-16T07:03:23+5:302017-05-16T07:03:23+5:30
गेल्या एक-दोन वर्षांत शहरात अनेक प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रिटचे रस्ते बांधण्यात आले आहेत
सुषमा नेहरकर-शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या एक-दोन वर्षांत शहरात अनेक प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रिटचे रस्ते बांधण्यात आले आहेत. शहरातील ८० ते ९० टक्के सिमेंट रस्त्यांवर पावसाळी गटाराची सुविधाच नसल्याचे ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत निदर्शनास आले. यामुळे ऐन पावसाळ्यात या रस्त्यांवरचे पाणी थेट आजूबाजूच्या घरांमध्ये शिरण्याचा धोका वाढला आहे. याची पहिली झलक शनिवारी झालेल्या अवकाळी पावसात काही भागांतील नागरिकांनी अनुभवली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात बहुतेक सर्व नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या प्रभागामध्ये सिमेंटच्या रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. हा निधी खर्च करताना रस्ते तयार करतानाचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात
आल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी गरज नसतानादेखील शहरातील अनेक गल्लीबोळांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्यात आले आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी काम करण्याच्या उद्देशाने वाटेल त्या
पद्धतीने चांगले डांबरी रस्ते उखडून सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्यात आले. डांबरी रस्त्यांपेक्षा या रस्त्यांची उंची तब्बल ८ ते १० इंच उंच करण्यात आले आहे.