कोरोनाच्या भीतीमुळे मृत्यूपत्र करणा-यांच्या संख्येत १३ टक्क्यांनी वाढ;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:09 AM2021-05-30T04:09:59+5:302021-05-30T04:09:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये असंख्य लोकांचे प्राण गेले. जर कोरोनामुळे आपल्याला देखील जीव गमवावा लागला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये असंख्य लोकांचे प्राण गेले. जर कोरोनामुळे आपल्याला देखील जीव गमवावा लागला तर काय? या धास्तीने अनेकांची झोप उडवली. या भीतीपोटीच स्वकमाईची प्रॉपर्टी, दागदागिने, बँकेतील एफडी, फ्लॅट या गोष्टी आपल्या वारसदारांना मिळाव्यात याकरिता मृत्यूपत्र करणा-यांच्या संख्येत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निवृत्तीनंतर नव्हे तर वयाच्या ५० वर्षातच मृत्यूपत्र करून ठेवण्याकडे सामान्यांचा कल वाढत आहे. यात आता तरुणाईदेखील मागे राहिलेली नाही. आयटी कंपनीमधील ४० वर्षीय तरुणांची देखील मृत्यूपत्र करण्यासंबंधी वकिलांकडे विचारणा होत आहे.
साधारणपणे निवृत्त झाल्यानंतर किंवा सत्तरीच्या वयात तब्येतीची स्थिती बघून घरातील ज्येष्ठ व्यक्ती वकिलाला बोलावून मृत्यूपत्राची प्रक्रिया पूर्ण करीत होती. पण आता हीच वयाची चौकट काहीशी पन्नाशीपर्यंत खाली आली आहे. घरातील ५० ते ५५ वर्षांच्या कर्तव्य व्यक्तीला देखील मृत्यूपत्र करून ठेवण्याची गरज वाटू लागली आहे. आपल्यानंतर कुटुंबात वादविवाद होऊ नयेत आणि प्रत्येकाला त्यांचा हक्क मिळावा, अशी मानसिकता लोकांच्या मनात घर करू लागली आहे. आयटी कंपनीमधील तरुणदेखील मृत्यूपत्र करण्यासाठी वकिलांकडे विचारणा आणि त्यांच्याशी सल्लामसलत करीत आहेत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तरुणाईला विळखा घातला. आयटीमधील तरुणांचे आर्थिक पॅकेज चांगले असल्याने त्यांनी फ्लॅटसह अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक केलेली दिसते. त्यांच्या पश्चात त्यांचे आईवडिल, पत्नीला सर्व काही मिळावे ही त्यांचा मृत्यूपत्र करून घेण्यामागची कळकळ असल्याचे सांगण्यात येत आहे.
-----------------------------------------------------------
कोरोनामुळे ज्येष्ठांनाच नव्हे तर तरुणांनाही आयुष्याची शाश्वती राहिलेली नाही. आपल्या हातातील मिळकतीचा कुटुंबाला व्यवस्थित उपभोग घेता यावा, त्यांचे आयुष्य सुखकर व्हावे या हेतूने समाजात मृत्यूपत्र करणा-यांचे प्रमाण निश्चितच वाढलंय. लोकांच्या मनात भीतीयुक्त भावना वाढली आहे. पूर्वी मृत्यूपत्र करणा-यांचे प्रमाण कमी होते. पण कोरोनानंतर त्यात वाढ झाली आहे. माझ्या मिळकतीबाबत मालकीहक्क प्रस्थापित करताना कोणताही त्रास होऊ नये असे त्यांना वाटत आहे.
- अॅड. शिवाजी कदम-जहागिरदार, विश्वस्त पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन
----------------------------
कोरोनामुळे अकाली मृत्यूंची संख्या वाढत आहे. आपली प्रॉपर्टी वारसा हक्कदाराला मिळावी त्याबाबत कोणतेही वाद होऊ नयेत. कुटुंब एकत्र राहावे म्हणून लोक स्वकमाईवरच्या मिळकतीबाबत मृत्यूपत्र करून ठेवत आहेत. कायद्यानुसार मृत्यूपत्र रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. भविष्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊन मृत्यूपत्र केले जात आहे. एका आयटी कंपनीमधील पक्षकाराने देखील मृत्यूपत्र करण्याबाबत विचारणा केली होती.
- अॅड. नितीन झंजाड, वकील
-----------
कोरोनाने आता जगण्याची सगळीच समीकरण बदलली आहेत. माझं अचानक बर-वाईट झालं तर कुटुंबाचं कसं होणार? याची एक मनात सारखी भीती वाटत राहते. उद्या मी गेल्यानंतर माझी मिळकत किती आहे, गुंतवणूक कुठे केली आहे. याची सर्व माहिती कुटुंबांना व्हावी आणि त्यांना त्यांचा हक्क मिळावा म्हणून मी मृत्यूपत्र लिहून ठेवले आहे आणि त्याबाबत कुटुंबाला देखील सांगितले आहे. मृत्यूपत्राबाबत सांगितल्यावर कुटुंब काहीसे घाबरले. पण का करतोय, कशासाठी करतोय हे शांतपणे सांगितले. तेव्हा त्यांनाही ते पटले.
- शिरीष ओक (नाव बदलेले) ज्येष्ठ नागरिक
------------------------------
माझा मृत्यूपत्र करून ठेवण्याकडे फारसा कल नव्हता. आता कुठं ५२ वर्षांचा आहे. बघू निवृत्तीनंतर करू असं ठरवलं होतं. पण मित्राने परिस्थितीचे गांभीर्य सांगितले आणि ते मनापासून पटले. दोन साक्ष्ीदारांच्या सह्या घेऊन मृत्यूपत्र घरीच लिहून ठेवले आहे. किमान कुटुंबाचे भविष्य तरी सुरक्षित ठेवू शकलो.
- विनायक कारखानीस, (नाव बदललेले) नोकरदार
--------------------------
मृत्यूपत्रासाठी आवश्यक गोष्टी
* मृत्यूपत्र करताना डॉक्टरांचे आरोग्याच्या स्थितीबाबतचे प्रमाणपत्र, दोन साक्षीदारांच्या सह्या आवश्यक आहेत. साक्षीदार हे तरुण असण्याला प्राधान्य देण्यात यावे.
* मृत्यूपत्र केल्यानंतर नोटरी किंवा स्टँंप अथवा नोंदणीची गरज नाही.
* आपल्या हयातीत अनेकवेळा मृत्यूपत्र किंवा साक्षीदार बदलता येऊ शकतात.
* मृत्यूपत्र हे स्वकष्टाच्या मिळकतीबाबतच करता येते. वारसा हक्काने येणारी प्रॉपर्टी त्यात समाविष्ट होऊ शकत नाही.
-------------------------