राज्यातील सत्ताधारी व केंद्रातील विरोधी पक्षामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती: गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 04:32 PM2021-01-25T16:32:49+5:302021-01-25T16:50:12+5:30
देशात अशांतता निर्माण करण्याचे काम सुरु आहे.
पुणे : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे शेतकर्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत. मात्र, मागील दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये निश्चितपणे डाव्या विचारसरणीचे लोक सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडून केंद्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तसेच देशात अशांतता निर्माण करण्याचे काम राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधी पक्षांकडून सुरु आहे. हे योग्य नसून आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात यायला हवे असा हल्लाबोल पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी केला आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप खासदार गिरीश बापट हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनासह विविध मुद्दयांवर भाष्य केले. बापट म्हणाले, केंद्र सरकारने केलेल्या कायदा कुठल्याही परिस्थितीत रद्द केला जाणार नसून त्यात काही सुधारणा केल्या जातील. तसंच कायदा मागे घेतला जाणार नाही यावर सरकार ठाम आहे.
... त्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागेल
मुंबईत होत असलेल्या आंदोलनात शरद पवार सहभागी झाले आहेत. मात्र त्यांनी पूर्वी देखील अशाच कायद्याचे विचार अनेकवेळा मांडलेले आहेत. आता मात्र तेच त्यांच्या मूळ विचाराला विरोध दर्शवित आहेत. जे काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात होते. तेच आम्ही मांडत आहोत. त्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागेल,” अशी भीती त्यांनी बोलून दाखवली.
राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर नाही; पण...
राज्यातील ठाकरे सरकार मला काही अस्थिर वाटत नाही. मात्र ज्यावेळी ते पडेल त्यांला कारणीभूत तेच असतील. आणि जरी ते पडले नाही तरी आम्हाला काही त्याच्याशी देणे घेणे नाही. या घडीला आम्ही राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत असून यापुढेही ते करत राहणार आहोत, असे भाष्य पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे.