बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची सुळेंना भीती, खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी
By नितीन चौधरी | Published: May 6, 2024 05:20 PM2024-05-06T17:20:43+5:302024-05-06T17:24:14+5:30
या संदर्भात त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांना पत्र लिहिले असून या गैरप्रकारांबाबत खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.....
पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आहेत. या मतदारसंघात मंगळवारी (दि. ७) होणाऱ्या मतदानावेळी या मतदारसंघातील सुमारे १५० होऊन अधिक मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडण्याची भीती सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांना पत्र लिहिले असून या गैरप्रकारांबाबत खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
बारामतीची निवडणूक सध्या देशपातळीवर गाजत असून पवार कुटुंबातील ही लढाई आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. या मतदारसंघातील सुमारे १५७ मतदान केंद्रांवर गैरप्रकार घडण्याची भीती सुळे यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाने या सर्व मतदान केंद्रांवर खबरदारीच्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी विनंती त्यांनी द्विवेदी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी लेखी पत्र तसेच ई-मेल द्वारेदेखील ही बाब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे. त्यानुसार बारामती विधानसभा मतदारसंघातील शहरातील १२, ग्रामीण भागातील ४७, दौंडमधील ३३, पुरंदरमधील ३१, भोरमधील ३१ व खडकवासला विधानसभा मतदारसंघातील ३ मतदान केंद्रांवर गैरप्रकार घडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत द्विवेदी म्हणाल्या, “सुळे यांची तक्रार आली आहे. त्यात ठोस कारण दिलेले नाही. मात्र, तरीदेखील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच गैरप्रकार घडणार नाहीत यासाठी अधिक काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”