मनी लाँड्रिंग केसची भीती, तरुणाला २९ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: May 12, 2024 05:50 PM2024-05-12T17:50:57+5:302024-05-12T17:51:27+5:30
पोलिसी कारवाईची भिती दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे
पुणे: तुमच्या विरोधात मनी लॉन्डरिंगची केस आहे तुम्हाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल अशी भीती दाखवून तरुणाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पोलिसी कारवाईची भिती दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. ११) लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रसाद प्रल्हाद जाधव (वय- ३३, रा. वाघोली) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, हा प्रकार २९ मार्च २०२४ रोजी घडला आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी फोन केला. तुमचे नाव मनी लॉन्डरिंगमध्ये असल्याने पार्सल कस्टम विभागाकडे अडकले आहे. तसेच त्यात अवैध अमली पदार्थ सापडले आहे. तुमच्या नावाचा गैरवापर केला जात असून त्यासाठी तुमचे आधारकार्ड व बँक खात्याचा वापर करून मनी लॉन्डरिंग करण्यात आली आहे असे सांगून एक लिंक पाठवत तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यांनतर पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगून चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल असे सांगून अटकेची भीती दाखवली. तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे सांगत तक्रारदार यांना २९ लाख ४९ हजार रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे करीत आहेत.