वीज कट होण्याची भीती; साडेतीन लाखांची फसवणूक, चार महिन्यांनी गुन्हा दाखल
By भाग्यश्री गिलडा | Published: March 21, 2024 03:38 PM2024-03-21T15:38:48+5:302024-03-21T15:39:11+5:30
महिन्याचे वीजबिल भरलेले नाही तर लाईट कट होईल असे सांगून वीजबिल भरण्यासाठी तगादा लावला
पुणे : महावितरणचेवीजबिल भरले नाही म्हणून वीज कट होईल असे सांगून सायबर चोरट्यांनी वडगाव परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. मात्र घटना घडल्यावर तब्बल ४ महिन्यांनी बुधवारी (दि. २०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वडगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या प्रशांत लक्ष्मण दळवी यांनी बुधवारी (दि. २०) सिंहगड पोलिसांना फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार हा प्रकार ७ नोव्हेंबर २०२३ रोजी घडला आहे. तक्रारदार यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. महावितरणकडून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे मागील महिन्याचे वीजबिल भरलेले नाही असे सांगितले. त्यांनतर वीजबिल भरले नाही तर लाईट कट होईल असे सांगून वीजबिल भरण्यासाठी तगादा लावला. त्यासाठी क्विक सपोर्ट नावाचे अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. अप्लिकेशनचा वापर करून फिर्यादींच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा मिळवला. त्याद्वारे खासगी माहितीचा वापर करून फिर्यादींच्या बँक खात्यातून तब्बल ३ लाख ६८ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलीस ठाण्यात धाव घेत झालेल्या प्रकारचा जबाब दिला. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्षीरसागर हे करत आहेत.