भीतीने तीन दिवस उपाशी, पण डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळेच कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:06 AM2021-05-03T04:06:30+5:302021-05-03T04:06:30+5:30
३५ वर्षीय विजय म्हस्के यांचा अनुभव : व्हेंटिलेटर, ऑक्सिजनवर असतानाही कोरोनाला हरवले पॉझिटिव्ह स्टोरी पुणे : ''डॉक्टर म्हणजे देव ...
३५ वर्षीय विजय म्हस्के यांचा अनुभव : व्हेंटिलेटर, ऑक्सिजनवर असतानाही कोरोनाला हरवले
पॉझिटिव्ह स्टोरी
पुणे : ''डॉक्टर म्हणजे देव नाहीत. ती आपल्यासारखीच माणसे आहेत. वैद्यकीय कर्मचारी कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अक्षरशः जिवाचे रान करत आहेत. डॉक्टरांवरील ताण कमी करायचा असेल, तर प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर काळजी घ्यायलाच हवी. कोरोना नाहीच, असे वाटणे हा तद्दन वेडेपणा आहे. आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे. काही लक्षणे दिसलीच तर उपचार वेळेत घ्या, अन्यथा पुढच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते'', आधी ऑक्सिजन, मग व्हेंटिलेटर लावण्याची वेळ ओढवलेल्या आणि डॉक्टरांवरील विश्वासामुळे कोरोना संकटातून सहीसलामत बाहेर पडलेल्या आयटी क्षेत्रातील 35 वर्षीय विजय म्हस्के यांच्या या भावना आहेत.
गेल्या वर्षभरापासून वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने फारसे घराबाहेर पडण्याची वेळ आली नाही. एका घरगुती कार्यक्रमासाठी आई आणि पत्नी गावाला गेल्यामुळे विजय म्हस्के एकच दिवस भाजी आणण्यासाठी बाहेर पडले. दुसर्या दिवशी त्यांना सर्दी झाल्याची जाणीव झाली. तिसऱ्या दिवशी सर्दी बरी झाली आणि थोडासा ताप आला, यानंतर घसा दुखू लागला. दुसऱ्या दिवशी घसा दुखणेही थांबले. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन असेल, असे वाटले. चौथ्या दिवशी मात्र 102 -103 इतका ताप वाढला. त्यावेळी ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी कोरोनाची चाचणी करण्यास सुचवले. दवाखान्यातून ते थेट चाचणी करण्यासाठी खाजगी प्रयोगशाळेत गेले.
दुसर्या दिवशी सकाळपासूनच श्वास घ्यायला त्रास होत. दुपारी बारा वाजता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे प्रयोगशाळेकडून कळवले. त्यांनी फोन करून डॉक्टरांना कल्पना दिली आणि घरीच आयसोलेट झाले. दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान औषध आणण्यासाठी पायऱ्या उतरत असतानाच श्वास घेण्यास खूप त्रास झाला. विजय हे औंधमधील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. घरी असताना ऑक्सिजन पातळी. ९२ इतकी होती. डॉक्टरकडे गेल्यावर ती ७९ पर्यंत खाली आली होती. डॉक्टरांनी तातडीने ॲडमिट करून घेतले आणि हाय फ्लो ऑक्सिजन लावण्यात आला. त्यावेळी ताप वाढला होता, घाम येत होता, अंगदुखी प्रचंड वाढली होती.
विजय म्हस्के यांची लक्षणे वाढल्याने व्हेंटिलेटर लावला. पुढील तीन ते चार दिवस ते व्हेंटिलेटरवरच होते. आजूबाजूला 14 ते 15 कोरोनाग्रस्त रुग्ण होते. दररोज किमान एकाचा मृत्यू होत होता. त्यामुळे त्यांचे मन विचलित झाले. रक्तदाबही सातत्याने खाली-वर होत होता. एचआरसीटी स्कोर 22 पर्यंत पोहोचला होता. श्वास घेण्यास त्रास होत असला तरी वय कमी असल्यामुळे तुम्ही या संकटातून नक्कीच बाहेर पडाल, असा आत्मविश्वास डॉक्टरांनी दिला. विजय हे सलग तीन दिवस व्यवस्थित जेवलेही नव्हते. डॉक्टरांनी स्वतः समोर उभे राहून त्यांना जेवण्यास सांगितले. आजूबाजूला लक्ष देऊ नका आणि फक्त स्वतःच्या प्रकृतीचा विचार करा, असा प्रेमळ सल्लाही दिला.
विजय म्हणाले, ''मी आयुष्यात पहिल्यांदाच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो होतो, तेही कोरोनामुळे. डॉक्टरांनी दिलेल्या धीरामुळे आणि त्यांनी दिलेला आत्मविश्वास त्यामुळे आपण यातून बरे होणारच, असा विश्वास वाटू लागला होता. सहाव्या दिवशी ऑक्सिजन पातळी ९४ वर पोहोचली. अकराव्या दिवशी तब्येत पूर्णपणे सुधारल्यामुळे डिस्चार्ज दिला. अनिरुद्ध भांबुरकर सर, प्रियंका मॅडम यांचा खूप पाठिंबा मिळाला. हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स, इतर कर्मचारी यांच्यावर प्रचंड ताण असतो. तरीही ते प्रत्येक रुग्णाची मनापासून काळजी घेत असतात. शारीरिक दुखणे बरे करण्याबरोबरच मानसिक आधारही देत असतात. त्यामुळे एखादी वाईट घटना घडल्यास डॉक्टरांवर राग काढणे चुकीचे आहे. माझ्यामुळे दोन्ही भावानाही संसर्ग झाला होता. पण सुदैवाने तो सौम्य स्वरूपाचा होता आणि तेही यातून बाहेर पडले.''