खरीप वाया जाण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:36+5:302021-07-08T04:08:36+5:30
यावर्षी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात संपूर्ण शिरूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. सुरुवात चांगली झाल्यामुळे ...
यावर्षी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात संपूर्ण शिरूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. सुरुवात चांगली झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते त्यांनी लगेच संकरित बाजरी मूग, लाल कांदा, कडधान्ये चारा पिके अशा पिकांची तातडीने पेरणी केली होती. परंतु, पिके उगवून आल्यानंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली. सुरुवातीला यावर्षीचा खरीप हंगाम जोरदार होईल अशी शेतकऱ्यांची धारणा होती. मात्र, पेरणीनंतर महिना उलटून गेला, तरी पावसाचा पत्ता नाही. पाऊस नाही ,त्यातच प्रचंड उष्णता यामुळे उगवून आलेल्या पिकांची वाढ खुंटली आहे.
बाजरी पिकाने कसाबसा तग धरला असून, उर्वरित सर्व पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पिकांच्या दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
पावसाच्या या लहरीपणामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. छोट्या जिरायतदार शेतकऱ्यांनी सुरुवातीची पेरणी उधार-उसनवार घेऊन केली होती. आता बरचसा हंगाम जवळ जवळ वाया गेला असून, शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.