अटकेच्या भीतीने बीएचआरच्या गुंतवणूकदारांचे परत केले १०० टक्के पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:53+5:302021-07-08T04:09:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीआरएच) पतसंस्थेच्या ठेवीदारांचे केवळ ४० टक्के पैसे देऊन त्यांच्याकडून १०० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीआरएच) पतसंस्थेच्या ठेवीदारांचे केवळ ४० टक्के पैसे देऊन त्यांच्याकडून १०० टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेणाऱ्या कंपनीने अटकेच्या भीतीने इंदापूर तालुक्यातील ६४ ठेवीदारांचे उरलेले ६० टक्के त्यांच्या बांधावर जाऊन परत केले. या ठेवीदारांचे सुमारे १ कोटी ७५ लाख रुपये परत केले असून ठेवीदारांना शोधून आता ते पैसे परत करत आहेत. पुणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांना एकामागोमाग अटक करण्यास सुरुवात केल्याने हे घडून आले आहे. पुणे पाेलिसांमुळेच आम्हाला पैसे परत मिळाले अशी भावना या ठेवीदारांनी व्यक्त केली आहे.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे बीआरएच पतसंस्थेची शाखा २०१३ मध्ये सुरू झाली होती. या पतसंस्थेत तेथील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी प्रामुख्याने या पतसंस्थेत ठेवी ठेवल्या होत्या. २०१४ मध्ये ही पतसंस्था बंद पडली. त्यानंतर पैसे मिळविण्यासाठी या शेतकऱ्यांनी जळगावला जाऊन बीआरएच च्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजविल्या. परंतु, तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याने त्यांना कार्यालयातही येऊ दिले नाही.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या महिन्यात निमगाव केतकी येथील ठेवीदारांच्या घरी जाऊन त्यांच्या ठेवींविषयीची माहिती घेतली. पोलीस निरीक्षक भोसले व त्यांच्या पथकाने बीआरएचमध्ये गुंतवणूक केलेल्यांची यादी तयार करून त्यांचे जबाब नोंदविले. त्याचबरोबर या ठेवीचे ४० टक्के पैसे देऊन १००टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेणाऱ्या ओम शिवम बिल्ट कॉन या कंपनीच्या लोकांचेही जबाब नोंदविण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पोलिसांनी दुसऱ्र्यांदा कारवाई करून आणखी काही जणांना अटक केली. तसेच इंदूरहून जितेंद्र कंडारे यालाही अटक केली. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारे ठेवी घेतल्या होत्या. त्यांचे धाबे दणाणले. त्यामुळे या कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लोकांना त्यांचे पैसे परत करण्यास सुरुवात केली.