नकली बियाणांच्या धास्तीने शेतकरी स्वत: करू लागले कांदा बी तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:11 AM2021-03-27T04:11:54+5:302021-03-27T04:11:54+5:30
मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांची नकली कांद्याच्या बियाणे खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली होती. परिणामी ‘तेलही गेले अन् तूपही ...
मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांची नकली कांद्याच्या बियाणे खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली होती. परिणामी ‘तेलही गेले अन् तूपही गेले’ अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. ३ हजार रुपये प्रतिकिलो महागड्या दराने खरेदी केलेले कांदा बी पूर्णतः नकली निघाल्यामुळे येथील शेतकरी पुरता हतबल झाला होता. बियाणे खरेदीत शुद्ध फसवणूक झाल्याचे उशिराने लक्षात आले होते. त्यामुळे या वर्षी पूर्णपणे दक्षता घेत शेतकऱ्यांनी स्वतःच घरच्या शेतीत डोंगळे लावून दर्जेदार कांदा बी तयार करण्याचे ठरविले आहे.
खामुंडी येथील शेतकरी संतोष काशिनाथ शिंगोटे यांनी २० गुंठे क्षेत्रात डोंगळे लावून उत्तम प्रतीचे कांदा बी तयार केले आहे. त्यासाठी त्यांना सुमारे ३० हजार इतका खर्च आला आहे. चार महिन्यांच्या अल्प कालावधीत उत्कृष्ट असे अंदाजे ७० ते ८० किलो कांदा बी तयार करण्यात ते यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील गेल्या वर्षी विकतच्या बियाणांचा वाईट अनुभव आल्यामुळे शिंगोटे यांचेच अनुकरण इतर शेतकऱ्यांनीही केल्याचे निदर्शनास येते.
उत्तम प्रतीच्या कांदा पिकाचे आगर म्हणून आणे माळशेज पट्ट्यातील गावागावांत उत्पादित केलेला दर्जेदार कांदा "ओतूर कांदा " या नावाने राज्यभर प्रसिध्द आहे.ओतूर येथे जुन्नर बाजार समितीचे उपबाजार कांदा विक्रीचे केंद्र असून या भागात कांदा उत्पादनासाठी लागणारे सर्वोत्तम हवामान , कसदार जमीन व मुबलक पाण्याचे प्रमाण यामुळे दर्जेदार कांदा उत्पादनाला येथील शेतकरी प्राधान्यक्रम देत असतात.
फोटोओळ:- काढणीस आलेले डोंगळे दाखविताना खामुंडी येथील शेतकरी संतोष शिंगोटे.