बंदुकीचा धाक दाखवून डॉक्टर दाम्पत्याला नवीन कात्रज बोगद्याजवळ लुबाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 12:03 PM2020-09-28T12:03:46+5:302020-09-28T12:04:16+5:30
सव्वा लाखांचा ऐवज लंपास : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : डॉक्टर पतीपत्नी कारमधून जात असताना नवीन बोगद्याजवळ मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा जणांनी बंदुकीचा धाक दाखवून सव्वा लाखांचा ऐवज लुबाडला. ही घटना मुंबई बंगलुरु महामार्गावर साताऱ्याकडून पुण्याकडे येताना नवीन कात्रज बोगद्याजवळ २७ सप्टेंबरला मध्यरात्री साडेबारा वाजता घडली.
याप्रकरणी डॉ़ चिन्मय विठ्ठल देशमुख (वय ३२, रा. राजश्री शाहु सोसायटी, बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. देशमुख हे पत्नीसह साताऱ्याहून पुण्याकडे येत होते. नवीन कात्रज बोगदा ओलांडल्यानंतर डॉक़्टरांनी लघुशंका करण्यासाठी कार थांबविली. त्याचवेळी मोटारसायकलवरुन दोघे जण आले. त्यांनी कारमधील त्यांच्या पत्नीच्या पोटाजवळ बंदुक लावून पैशांची मागणी केली. त्यांनी डॉक्टर व त्यांच्या पत्नीकडील २ तोळ्यांच्या दोन अंगठ्या, घड्याळ असा १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर ते मोटारसायकलवरुन पळून गेले. महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. तसेच या परिसरात सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे चोरट्यांचा माग काढण्यात अडचणी येत असून पोलीस उपनिरीक्षक एम डी़ पाटील अधिक तपास करीत आहेत.