मेट्रोच्या कनेक्टिव्हिटीसाठी फीडर बसची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:53 AM2018-09-01T01:53:01+5:302018-09-01T01:53:42+5:30
फायद्याबाबत साशंक : गोडाऊनच्या जागेवर ४० मजली इमारत
पुणे : मेट्रोसाठी कनेक्टिव्हिटी नसेल, तर ती तोट्यात जाण्याची शक्यता असल्याने प्रवाशांना थेट मेट्रो स्थानकापर्यंत नेण्या-आणण्यासाठी फीडर बस सुरू करण्यात येणार आहे. स्थानकापासून २ किलोमीटरच्या परिघात ही छोट्या वाहनांची सुविधा असेल. उन्नत, भुयारी व शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो एकत्र येणार आहे त्या गोदामाच्या जागेवर इंटरचेंज्ािंग स्थानक असेल. तिथे ४० मजली इमारत बांधण्यात येणार आहे.
वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गाचे मुख्य प्रकल्प अभियंता अतुल गाडगीळ यांनी ही माहिती दिली. रांची, जयपूर येथे मेट्रो सुरू झाली. शहरातून मेट्रो स्थानकापर्यंत प्रवाशांना येण्यासाठी सुलभ व्यवस्था न केल्यामुळे या मेट्रोना अपेक्षित प्रवासी मिळाले नाहीत. त्यामुळे आता केंद्र सरकारने देशात जिथे मेट्रो प्रकल्प सुरू आहेत, त्या सर्व ठिकाणी प्रवाशांना थेट स्थानकापर्यंत नेण्या-आणण्यासाठी म्हणून लहान वाहनांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुण्यातही अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.
ही वाहने लहान असतील. २ किलोमीटरच्या परिघात ती फिरतील. प्रवाशांना त्यातून थेट मेट्रो स्थानकापर्यंत येते येईल किंवा मेट्रोमधून बाहेर पडल्यावर शहरात इच्छित स्थळी जाता येईल. ही वाहने इलेक्ट्रिक वाहनेही असू शकतील. महामेट्रो कंपनीकडे त्याची व्यवस्था असेल किंवा स्थानिक प्रवासी सेवाही हे काम करू शकेल. त्याचे शुल्क मेट्रोच्या शुल्कात निगडित असेल. खासगी कंपनीही हे काम करू शकेल, असे गाडगीळ यांनी सांगितले. पुणे मेट्रोसाठी अशी व्यवस्था करण्यात येणार आहे; मात्र ती चालवायची कोणी, याचा
निर्णय अद्याप झालेला नाही, असे ते म्हणाले.
सरकारी गोदामाच्या येथे करण्यात येणाऱ्या इंटरचेंज स्टेशनसाठी ४८ हजार चौरस फूट जागा लागणार आहे. यातील सरकारी मालकीची गोदामाची जागा मेट्रोकडे हस्तांतरित झाली आहे. उर्वरित वसाहती असलेल्या जागेबाबत बोलणी सुरू आहेत. या सर्व रहिवाशांचे योग्य ठिकाणी समाधान कारक पुनर्वसन करण्यात येईल. संपूर्ण जागा ताब्यात आल्यानंतर तिथे ४० मजली इमारत बांधण्यात येणार आहे. त्यात मेट्रोचे इंटरचेंज स्टेशन असेल, उर्वरित इमारत व्यावसायिक वापरासाठी मेट्रोच्या वतीने देण्यात येईल, अशी माहिती गाडगीळ यांनी दिली.
इंटरचेंजिंग स्टेशन
मेट्रो मार्गाचे काम सुरू असतानाच इंटरचेंजिंग स्टेशनचेही काम करण्यात येईल. तिन्ही स्थानके वेगवेगळी असतील. त्यातील वनाझ ते रामवाडी हा मार्ग उन्नत आहे व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मार्ग शिवाजीनगरपासून स्वारगेटपर्यंत भुयारी असेल. भुयारी मार्गाचे स्थानक खाली जमिनीत व त्यावर उन्नत मार्गाचे स्थानक अशी एकाखाली एक स्थानके असतील. शिवाजीनगर ते हिंजवडी हे स्थानक या दोन्ही स्थानकांपासून थोडे दूर प्रस्तावित करण्यात आले आहे. ते कदाचित बदलण्यात येईल.
मेट्रो कनेक्टिव्हिटीसाठी फक्त फीडर बसच नाही, तर सायकल, शेअरिंग रिक्षा, पीएमपी, टॅक्सी अशा अनेक गोष्टी आहेत. शिवाय काही
रस्त्यांवर स्काय वॉकही बांधण्यात येणार आहेत.